मुख्यमंत्र्यांचे आवाहन : जीसीसीआयची ११७ वी आमसभा
आमसभेला उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो व जीसीसीआयचे पदाधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उद्योग क्षेत्राने गोव्याला स्वच्छ आणि हरित ठेवून येथे औद्योगिक क्रांतीसाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सरकार उद्योग क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. शनिवारी पणजी येथे झालेल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या (जीसीसीआय) ११७ व्या आमसभेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो, संघटनेच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, श्रीनिवास धेंपो, संजय किर्लोस्कर, संजय आमोणकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही गोव्यात हरित उद्योगांना प्राधान्य देत आहोत. नुकतेच आयपीबीने याच धर्तीवर प्रकल्प मंजूर केले आहेत. राज्यात जलमार्गांचा विकास हा इको टुरिझम, वॉटर टॅक्सीसाठी केला जात आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोळसा हाताळणी वाढवणार नाही. सरकारने धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिसुर्ले येथे विशेष कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. मात्र राज्यातील ३५० पैकी केवळ ५० आस्थापनेच येथे कचरा टाकत आहेत. उर्वरित अस्थापने चुकीच्या पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहेत. अशा कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, हे उद्योगांनी समजून घेणे आवश्यक आहे. काही समस्या असल्यास सरकारसोबत चर्चा करावी. आम्ही उपाययोजना करण्यास तयार आहोत. गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी उद्योग क्षेत्राची मदत आवश्यक आहे.
महिला ५० टक्के स्टार्टअप चालवत आहेत !
गोवा महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे आदर्श मॉडेल बनू शकते. गोव्यातील एकूण स्टार्टअपपैकी ५० टक्के महिला चालवत आहेत. राज्यातील महिला स्वयंसाहाय्य गट चांगली प्रगती करत आहेत. उद्योग क्षेत्राने महिला व्यावसायिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सरकार मदत करण्यास तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दोन वर्षांत फायबर ऑप्टिक्सचे जाळे
पुढील दोन वर्षांत राज्यभरात फायबर ऑप्टिक्स कनेक्टिव्हिटी उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मदतीने वास्को, मडगाव आणि म्हापसाचा विकास करण्यात येईल. राज्यातील स्थानिक पर्यटकांत २२ टक्के, तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.