पणजीत १५ जुलै रोजी थेट मुलाखती
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भू नोंदणी खात्यात ४० जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये २० जागा क्षेत्र सर्व्हेक्षक (फिल्ड सर्व्हेयर), तर २० जागा एमटीएस पदाच्या आहेत. सर्व जागा एनएकेएसएचए प्रकल्पाअंतर्गत केवळ ४ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. सर्व जागांसाठी १५ जुलै रोजी सकाळी १०.३० पासून खात्याच्या पणजीतील मुख्यालयात मुलाखती होणार आहेत.
फिल्ड सर्व्हेयरसाठी मासिक ३२ हजार वेतन देण्यात येईल. एसएससी किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये गणित विषय घेतलेला असावा. किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका (डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वेक्षण विषय घेतलेला असावा. उमेदवारास जीएनएसएस उपकरणे वापरण्याचा अनुभव हवा. त्याच्याकडे १५ वर्षांचे राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र असणे व कोकणी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवाराला जीआयएसचे ज्ञान आणि मराठीचे ज्ञान असणे अपेक्षित आहे.
एमटीएससाठी दहावी किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला कोकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला अर्ज, छायाचित्र, मूळ कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रे, जन्म दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इ. च्या स्वसाक्षांकित प्रतींचा एक संच घेऊन उपस्थित राहावे. सर्व जागांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे आहे.
निवड झालेल्या उमेदवाराला कंत्राटाची मुदतवाढ मिळण्याबाबत हक्क असणार नाही. मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी टीए, डीए दिला जाणार नाही. वर नमूद आवश्यक पात्रतांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनीच प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांनी अर्जामध्ये मोबाईल क्रमांक नमूद करावा. कारण न देता कर्मचाऱ्याची सेवा, कंत्राट कालावधी पूर्ण होण्यापूर्वी समाप्त करण्याचे अधिकार विभागाकडे असल्याचे कळवण्यात आले आहे.