गोविंद गावडे यांच्याकडून दामू नाईकांवर शाब्दिक हल्ला

मी भाजप सोडणार नाही : राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त प्रियोळकरांनाच


23rd June, 12:28 am
गोविंद गावडे यांच्याकडून दामू नाईकांवर शाब्दिक हल्ला

माशेल सभेला उपस्थितांचे आशीर्वाद घेण्यासाठी साष्टांग दंडवत घालताना आमदार गोविंद गावडे. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पदाचा ‘वालोर’ (प्रतिष्ठा) माहीत नसलेल्या आणि कुठलीच चौकशी न करता मी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे विधान करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित करून आमदार गोविंद गावडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. मी भाजप सोडणार नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त प्रियोळच्या मतदारांना आहे, आणखी कोणालाच नाही, असेही गावडे यावेळी म्हणाले.
मंत्रिपदावरून हटविल्यानंतर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी रविवारी माशेल येथे कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन केले होते. कुटुंबातील सदस्य, हितचिंतक यांचे दुःख दूर करण्यासाठी आणि भावना व्यक्त करण्यासाठीच या सभेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभेला कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सभेला उपस्थित जनसमुदाय.
गोविंद गावडे ही व्यक्ती नव्हे, तर तो सामान्य जनतेचा आवाज आहे. या आवाजाला घाबरूनच सर्वांनी नाटके सुरू केली आहेत या वाक्यांनी भाषणाला सुरुवात केलेल्या गोविंद गावडे यांनी आपली राजकीय कारकीर्द सर्वांसमोर मांडली. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून मी विजयी झालो. निवडणुकीपूर्वी भाजपची उमेदवारी घेण्याची ऑफर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी दिली होती. कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन आपण ती स्वीकारली नाही. अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर माझ्या पाठिंब्याने स्व. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. पर्रीकर आजारी होते, तेव्हा त्यांनी सुदिन ढवळीकर यांना सरकारचा समन्वय पाहण्यासाठी नेमण्याचे ठरवले होते, मात्र तेव्हा मी विरोध केला. नंतरच्या काळात भाजपचाच आमदार मुख्यमंत्री व्हावा आणि त्यात माझे वर्गमित्र डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री व्हावेत, असे मी सुचवले होते. शिरोडा मतदारसंघात २०१९मध्ये पोटनिवडणूक झाली. तेव्हा मी भाजपमध्ये नव्हतो. तरीही भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या विजयासाठी मी प्रयत्न केला. सुभाष शिरोडकर निवडून आल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांचे मुख्यमंत्रिपदाचे आसन स्थिर झाले. आजपर्यंत मी कधीच भाजपच्या केंद्रीय समिती सदस्यांना भेटलेलो नाही.
‘वापरा आणि फेका’ नीती कोणाची ओळखा !
माजी आमदार स्व. विष्णू वाघ यांचाही पुरेपूर वापर करून नंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. ‘वापरा आणि फेका’ ही नीती कोणाची आहे, ते बहुजन समाजाने ओळखावे. क्रीडामंत्री असताना माझ्याच कार्यकाळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या. कला आणि संस्कृती खात्यातील योजना मी सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवल्या. सभापतींनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या आरोपानंतर मंत्रिपद सोडण्याची तयारी मी मुख्यमंत्र्यांशी बोलून दाखवली होती. खात्याला आणि जनतेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला.
आरोपांची चौकशी न करताच मंत्रिपदावरून हटवले
आदिवासी कल्याण खात्यावर आरोप केले म्हणून पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी वातावरण तयार केले. या आरोपांची चौकशी झाली नाही. चौकशी न करता मला मंत्रिपदावरून काढणे म्हणजे ते आरोप खरे असल्याचेच सिद्ध होते. गोवा क्रांती दिनीच मला मंत्रिपदावरून काढले याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मी पत्र लिहिणार आहे, असेही गोविंद गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.