एएनसीची कारवाई : ४५.५ ग्रॅम मेथाफेटामाईन जप्त
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) चोपडे येथे कारवाई करत कृष्णा सोनकेल्लू (वय २८, रा. पुणे) या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ६.८२ लाख रुपये किमतीचा ४५.५ ग्रॅम ‘मेथाफेटामाईन’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
एएनसी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोव्यातील किनारी भागांमध्ये विशेषतः आठवड्याच्या शेवटी पार्टीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी होत असल्याचे उघड झाले. यासाठी महाराष्ट्रातून उच्चशिक्षित तरुण ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यावर तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला.
संबंधित तरुण शुक्रवारी गोव्यात दाखल होऊन हरमल परिसरात वास्तव्यास असल्याचे आढळले. शनिवारी सायंकाळी तो चोपडे परिसरात ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त मिळाल्यानंतर अधीक्षक सुनीता सावंत आणि उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने चोपडे परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित कृष्णा सोनकेल्लू संशयास्पदरित्या फिरताना दिसून आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता त्याच्याकडून ४५.५ ग्रॅम ‘मेथाफेटामाईन’ हा उच्चप्रतीचा अंमली पदार्थ सापडला. बाजारभावानुसार या पदार्थाची किंमत अंदाजे ६.८२ लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला रविवारी पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.