गोव्याच्या आरुष पावसकरचा पराभव

ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धा: देव रुपारेलिया, पुष्कर साई, शैना मणिमुथु, लक्ष्या राजेश उपांत्यपूर्व फेरीत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21st June, 12:19 am
गोव्याच्या आरुष पावसकरचा पराभव

पणजी : पेडे येथील मल्टीपर्पज स्टेडियमवर सुरू असलेल्या योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सब-ज्युनिअर (१५ आणि १७ वर्षांखालील) रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेच्या सातव्या दिवशी गोव्याच्या आरुष पावसकरने दमदार खेळ करत घरच्या प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, त्याचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीत थांबला.
आरुष पावसकरची संघर्षमय कामगिरी
१७ वर्षांच्या मुलांच्या एकेरीत आरुषने केरळच्या फिकहम हमदालवर २१-१५, १०-२१, २१-१९ असा विजय मिळवला. तीन गेम्सच्या या चुरशीच्या लढतीत त्याने उत्कृष्ट खेळ केला. मात्र, त्यानंतर पंजाबच्या जागशेरसिंग खंगुरा (बॅडमिंटन आशियाचा कांस्यपदक विजेता) याच्याकडून त्याला ११-,२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला.
१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात महाराष्ट्राचा टॉप सीड देव रुपारेलिया याने कर्नाटकच्या हार्दिक दिव्यांशविरुद्ध २१-१२, १५-२१, २१-१५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
१५ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात कर्नाटकच्या पुष्कर साई याने हरयाणाच्या जयवर्धन हुड्डाला २१-१२, २१-१४ ने पराभूत केले. पंजाबच्या वजीर सिंग याने राजस्थानच्या जयवर्धन सिंगवर २१-१२, २१-१८ ने विजय मिळवला.
१५ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात शैना मणिमुथु हिने तेलंगणाच्या श्रुती येचिना हिला २१-१२, २१-११ ने हरवले. अवनी विक्रम गोविंद हिने कर्नाटकच्या धन्या मंजुनाथावर २१-६, २१-८ असा एकतर्फी विजय मिळवला. १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात लक्ष्या राजेश हिने राजस्थानच्या सोम्या भटनागरला १६-२१, २१-१७, २१-६ असा पराभव देत पुढील फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मोठा उलटफेर
१५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात हरयाणाच्या जयवर्धन हुड्डा आणि दिल्लीच्या हर्षित खत्री या जोडीने दुसऱ्या मानांकित समर्थ भारद्वाज आणि जतिन कुमार (हरयाणा) या जोडीचा २१-१५, २१-१९ असा पराभव करत स्पर्धेतील मोठा धक्का दिला.