योग साधनेतून 'स्वस्थ आणि सशक्त गोवा' घडवा, मुख्यमंत्र्याचे आवाहन
पणजी : मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधींसह मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगासने उपयोगी ठरतात. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे (International Yoga Day) औचित्य साधून प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्यासाठी योगासने करावीत. योगासनाच्या आधारे स्वस्थ गोवा, सशक्त गोवा करण्यास प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी गोव्यात १० ते १५ हजार ठिकाणी योगासनाचे कार्यक्रम होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशाच्या इतर भागांसह संपूर्ण गोव्यात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. शाळा, विद्यालये, सरकारी कार्यालये, पोलीस स्थानके, पंचायती मिळून प्रत्येक गावात योग दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. मुख्य कार्यक्रम सकाळी ६ ते ८.३० पर्यंत ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात (Dr. Shyama Prasad Mukherjee Stadium) होणार आहे. भारत स्वाभिमान ट्रस्ट, दिशा चॅरीटेबल ट्रस्ट, आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच अन्य संस्थांच्या आधारे गोव्यात ठिकठिकाणी योगा कार्यक्रम होणार आहेत. या आयोजित कार्यक्रमाची नोंदणी 'योगसंगम' या वेबसाईटवर आयोजकांनी करावी, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. सरकारी कार्यालये तसेच शिक्षण संस्थांसह आयुर्वेदिक महाविद्यालय, शिरोडा, ब्रह्मकुमारी, दिशा फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, ओमनिती वेदाश्रम, दत्त पद्मनाभ पीठ या संस्थांनी योगा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काही संस्था योगा कार्यक्रमासाठी सरकारी कार्यालयांत शिक्षकांची व्यवस्था करणार आहेत.