'स्पॉट द स्कॅम' आणि 'रेडीकल कंटेन्ट एनालायजर'मुळे तपासात होणार मदत
पणजी : गुन्ह्याच्या तपासात यापुढे गोवा पोलिसांकडून अधिकाधिक प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. तंत्रज्ञानाच्या वापरात इतर राज्यांच्या तुलनेत गोवा कायम पुढे राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'स्पॉट द स्कॅम' व 'रेडीकल कंटेन्ट एनालयजर'चा शुभारंभ करण्यात आला. ही दोन्ही उपकरणे बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत.
पश्चिम विभागीय राज्यांच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रेडीकल कंटेन्ट एनालायजरची प्रशंसा केली होती. इतर राज्येही या उपकरणाचा वापर करणार आहेत. आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. गुन्हेगार सुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने सराईतपणे गुन्हे करत आहेत. गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासह गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय अन्य पर्याय नाही.
'क्वीक पास्ट ॲप, ट्रॅक सेंटर, क्लाउड बेसड सायबर कॉल सेंटर' या तंत्रज्ञानाचा वापर पोलिसांनी सुरू केला आहे. 'स्पॉट द स्कॅम' व 'रेडीकल कंटेन्ट एनालायजर' मुळे सायबर गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मदत होणार आहे. ही दोन्ही उपकरणे तयार करण्याबद्दल बिट्स पिलानीचे विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत. यापुढेही सरकार बिट्स पिलानीची तंत्रज्ञानासाठी मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
याप्रसंगी पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.