नियमबाह्य कारवाई केल्याचा युक्तिवाद : जून २०१५ मध्ये केली होती अटक
पणजी : राजपत्रित अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यासमोर झडती घेण्याचा अधिकार पथकाला असल्याची माहिती संशयिताला दिली नाही. त्यामुळे ड्रग्ज बाळगल्या प्रकरणाची संपूर्ण कारवाई नियमात बसत नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित किंग्ज उचेना जॉन या नायजेरियन नागरिकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी दिला.
या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी २० जून २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सिद्धार्थ प्रभुदेसाई, पोलीस कर्मचारी बाबूराव देसाई, संज्योत केरकर व इतर पोलिसांनी गुप्तहेरांच्या माहितीवरून १९ जून रोजी रात्री ८ ते ११.१५ दरम्यान नाईकावाडो येथील सेंट अालेक्स चर्चसमोर डॉल्फिन सर्कल जवळ सापळा रचला होता. त्यावेळी कळंगुट पोलिसांनी त्या ठिकाणी संशयितरीत्या आलेल्या किंग्ज उचेना जॉन या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी १० हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम कोकेन जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर २३ जून २०१५ रोजी न्यायालयाने संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला.
न्यायालयीन प्रक्रिया आणि निकाल
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज मळीक यांनी तपासपूर्ण करून १९ फेब्रुवारी २०१६ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची तसेच न्यायवैद्यक अहवालाची दखल घेऊन २२ नोव्हेंबर २०१६ रोजी संशयिताविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. संशयितातर्फे अॅड. मायकल नाझारेथ यांनी बाजू मांडली. पोलिसांनी संशयित किंग्ज उचेना जॉन याला झडतीवेळी राजपत्रित अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यासमोर झडती घेण्याचा अधिकार असल्याची माहिती दिली नाही. तसेच पोलिसांनी कारवाई नियमबाह्य केली असल्याचा युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित जाॅन याची निर्दोष सुटका केली.