कोकणी नाटक ‘गांव जाला जाण्टो’ने रचला विश्वविक्रम

एकाच दिवसात सर्वाधिक सात प्रयोग करण्याचा पराक्रम

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
19th May, 12:26 am
कोकणी नाटक ‘गांव जाला जाण्टो’ने रचला विश्वविक्रम

पणजी : कोकणी नाटक ‘गांव जाला जाण्टो’ने एका दिवसात सर्वाधिक सात प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यानुसार रविवारी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात सकाळी ७.३० ते रात्री १२.३० या दरम्यान या नाटकाचे ७ प्रयोग सादर करण्यात आले. कला चेतना वळवई या संस्थेतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

अभिनेते राजदीप नाईक, सुचिता नार्वेकर, राजेश लोहिया, सायली कुडतरकर, ५ वर्षीय भूमी नाईक नार्वेकर व अन्य कलाकार यात सहभागी झाले होते. या नाटकाचे आयोजन कला चेतना, वळवई या संस्थेतर्फे केले होते. या नाटकाचा विक्रम ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया’मध्ये नोंद होणार आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम एका मराठी नाटकाच्या नावे होता. त्यांनी मुंबई येथे सलग सहा प्रयोग केले होते.

पहिला प्रयोग सकाळी ७.३० वाजता सुरू झाला. नाटकाचा कालावधी दोन तासांचा होता. एका प्रयोगानंतर अर्ध्या तासाने पुढील प्रयोग सुरू करण्यात आला. शेवटचा प्रयोग रात्री १०.३० वाजता सुरू होऊन १२.३० वाजता संपला. यावेळी उपस्थित नाट्यरसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून कलाकारांच्या कलेला दाद दिली.

म्हादई नदीच्या संवर्धनाचा संदेश

नाटकात म्हादई नदीच्या काठावर वसलेली गावे, तिथले निसर्गाशी असलेले नाते, शहरीकरणामुळे विस्कळीत होत चाललेली सामाजीक जीवनशैली हे विषय हाताळण्यात आले. म्हादई नदी ती थांबली तर सर्व संपेल, असा संदेश नाटकातून देण्यात आला.

हेही वाचा