क्रिकेट
विराट कोहली सातत्याने नवनवे विक्रम आपल्या नावावर करत आहे. आयपीएल २०२५ मध्येही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. १३ एप्रिल रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. या सामन्यात विराटने टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे शतक पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये १३००० धावांचा टप्पा ओलांडला होता आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. आता अर्धशतकांचे शतक झळकावून त्याने पुन्हा एकदा खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
विराट कोहली टी-२० मध्ये १०० अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर शानदार षटकार मारून आपले १०० वे टी-२० अर्धशतक पूर्ण केले. कोहली आता टी-२० क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक अर्धशतके करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा कारनामा फक्त ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने केला आहे.
विराटचे आयपीएलमधील हे ६६ वे अर्धशतक आहे. या बाबतीतही तो डेव्हिड वॉर्नरसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर शिखर धवनचा क्रमांक लागतो, ज्याने ५३ अर्धशतके केली आहेत. विराटने टी-२० मध्ये आपल्या ४०५ व्या सामन्यात ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने ४०५ सामन्यांच्या ३८७ डावांमध्ये ९ शतके आणि १०० अर्धशतकांच्या मदतीने १३,१३४ धावा केल्या आहेत. विराटने या हंगामातील ६ सामन्यांच्या ६ डावांमध्ये ६१.०० च्या सरासरीने २४८ धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
किंग कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके आणि धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २५६ सामन्यांमध्ये आठ शतकांसह ८,१६८ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने १२५ सामन्यांमध्ये १३७.०४ च्या स्ट्राईक रेटने आणि ४८.६९ च्या सरासरीने ४,१८८ धावा केल्या आहेत, ज्यात १ शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. आरसीबीने या हंगामात आतापर्यंत ६ सामन्यांमध्ये ४ विजय आणि १ पराभवाचा सामना केला आहे. गेली १८ वर्षे कोहली आरसीबीच्या संघासोबत आहे. मात्र या संघाला आतापर्यंत चषक पटकावता आलेला नाही. कोहलीच्या आयुष्यात १८ हा त्याचा लकी नंबर मानला जातो आणि आरसीबी संघासोबत कोहलीचे हे १८ वे वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी आरसीबी चषकावर नाव कोरेल, अशी आशा त्याचे आरसीबी आणि कोहलीचे फॅन्स बाळगून आहेत.
-प्रवीण साठे, दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत