मडगावातील कथित बलात्कार प्रकरण
मडगाव : परवानाधारक एजंट असल्याचे सांगत फसवणूक करणे व मानवी तस्करी प्रकरणी संशयित शब्रिश अशोक मांजरेकर (३२, रा. बोर्डा) याला मडगाव पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाकडून २५ हजारांचा वैयक्तिक हमी व तेवढ्याच रकमेचा हमीदार व इतर अटींवर जामीन मंजूर केला आहे.
परवानाधारक एजंट असल्याचे सांगत संशयिताकडून पीडितेला नोकरी देण्याचे आमिष दाखवले. कामासाठी कामगार देण्याचे आश्वासन देत कोंबमधील एका व्यक्तीकडून २५ हजाराची रक्कम घेतली पण ती रक्कम सदर युवतीला दिले नाही. कथित बलात्कार प्रकरणात चौकशी करताना ही बाब समोर आली.
त्यानुसार मडगाव पोलिसांकडून संशयित शब्रिश मांजरेकर याच्याविरोधात परवानाधारक एजंट असल्याचे खोटे सांगणे, पीडितेला देण्यासाठी घेतलेले पैसे तिला न देता फसवणूक करणे व नोकरीच्या निमित्ताने दुसर्या राज्यातून पीडितेला आणल्याप्रकरणी मानवी तस्करीप्रकरणी गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली होती. न्यायालयाकडून संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती.
संशयित मांजरेकर याने दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाली व अटीशर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाकडून २५ हजारांची हमी व तेवढ्याच रकमेचा हमीदार देणे, कायमस्वरूपी वास्तव्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक न्यायालयात सादर करणे, परवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे, आरोपपत्र झाल्यावर वेळोवेळी सुनावणीला हजर राहणे व साक्षीदारावर दबाव न आणणे तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न न करणे अशा अटीवर जामीन मंजूर केलेला आहे.