आमदार मायकल लोबो : शवदर्शन सोहळा व्यवस्थेचे विरोधी आमदारांकडून कौतुक
पणजी : डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आमदार विजय सरदेसाई हेही वावरले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार वेस्टर्न बायपास स्टिल्टवर उभारण्याची त्यांची मागणी डबल इंजीन सरकारने मान्य केली. सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी आमदारांच्या मतदारसंघांमध्येही अनेक विकासकामे झालेली आहेत, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार लोबो यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जसे विकसित भारतासाठी झटत आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सावंत हे विकसित गोव्यासाठी झटत आहेत. रोजगार, कौशल्य, आरोग्य, कृषी, मच्छिमारी या सर्व क्षेत्रात विविध योजना सरकारने सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारच्या त्याचप्रमाणे राज्याच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न डबल इंजीन सरकार करत आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्यासाठी प्राथमिक सुविधा आणि व्यवस्थेचे विरोधी पक्ष आमदारांनीही कौतुक केले, असे मायकल लोबो यांनी सांगितले.
खाणी सुरू केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन : प्रेमेंद्र शेट
खाणी सुरू करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. स्थानिक लोकांच्या समस्यांचा विचार करून खनिज व्यवसाय सुरू होण्याची गरज आहे. एक खाण सुरू केल्याबद्दल सरकारचे मी अभिनंदन करतो. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची बऱ्यांच जणांची भरपाई प्रलंबित आहे. प्रलंबित नुकसानभरपाईचे अर्ज लवकरात लवकर मंजूर करून त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली. ग्रामीण भागात पर्यटन वाढावे म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी बस सेवेची कमतरता आहे. माझी बस तसेच इतर योजनांद्वारे ही कमतरता दूर करावी, अशी मागणी शेट यांनी केली.
आरोग्य क्षेत्रात मोठे बदल : संकल्प आमोणकर
आरोग्य क्षेत्रात नवीन योजना तसेच नवीन सुविधा तयार होत आहेत. यामुळे या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. साखळी आरोग्य केंद्रात मोतिबिंदूवर शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. इतर केंद्रांमध्ये अशा शस्त्रक्रियांची सुविधा तयार व्हायला हवी, अशी मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली.
सुपरमार्केटमधील मालाची तपासणी व्हायला हवी : डिलायला
सुपर मार्केटबरोबरच मॉलची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुपर मार्केटमध्ये जे पदार्थ तसेच खाण्याच्या वस्तूंची विक्री होते, त्यांची एफडीएमार्फत तपासणी व्हायला हवी, अशी मागणी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी केली.
माझी बस योजनेचा विस्तार करावा : जेनिफर मोन्सेरात
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. यासाठी कदंब महामंडळाच्या माझी बस योजनेचा आणखी विस्तार करण्याची गरज आहे, असे ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले. महिलांसाठी खास हेल्पलाईन सेवा सुरू केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
गुन्ह्यांचा तपास लावण्याचे प्रमाण समाधानकारक : डॉ. चंद्रकांत शेट्ये
चोऱ्या तसेच गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात वाढ होत असली तरी तपासाचे प्रमाण वाढत आहे. गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण ८८.३८ टक्के आहे. इतर राज्यांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.
वारसा स्थळाजवळ कचरा प्रकल्प अयोग्य : क्रूझ सिल्वा
जुने गोवा येथे जागतिक पातळीच्या दर्जाचे वारसास्थळ आहे. बासिलिका चर्चजवळ कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे अयोग्य आहे, असे वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी सांगितले. सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्याच्या व्यवस्थेचे क्रूझ यांनी कौतुक केले.
कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल आणि नावेलीचे उल्हास नाईक तुयेकर यांनी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मात्र अभिभाषण तसेच सरकारवर टीका केली.
मी मंत्रिपदाच्या स्पर्धेत नाही : मायकल लोबो
सरकारवर अनेक वेळा टीका करणारे आमदार मायकल लोबो यांनी अभिभाषणावर बोलताना सरकारचे कौतुक केले. त्यावर ‘चांगली लॉटरी लागण्याची शक्यता आहे,’ असा टोमणा आमदार विजय सरदेसाई यांनी लोबोंना मारला. त्यानंतर लोबो यांनी स्पष्ट केले की, आपण मंत्रिपदाच्या स्पर्धेत नाही.