वडील-मुलीच्या नात्यावर चित्रपट बनताना पहाणे हा आनंददायक अनुभव असे अभिषेक बच्चन म्हणतो. निमित्त आहे ‘बी हॅपी’ या चित्रपटाचे.
यापूर्वी प्रदर्शित झालेला ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट असेल किंवा आगामी ‘बी हॅपी’ हा चित्रपट, आपण अशा चित्रपटांची जाणीवपूर्वक निवड करत असल्याचे अभिनेता अभिषेक बच्चन सांगतो. आगामी ‘बी हॅपी’ हा चित्रपट वडील-मुलीच्या नात्यावर आधारित असून, हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर या पैलूवर फारसे चित्रपट बनले नसल्याचे त्याला वाटते.
शुजित सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’ आणि नृत्यदिग्दर्शक ते दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘बी हॅपी’ या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिषेक एका सिंगल फादरच्या भूमिकेत आहे.
“वडील-मुलीच्या नात्यातील गुंत्यावर आधारित किंवा आई नसताना त्या कुटुंबाच्या आयुष्यात काय घडते? अशा विषयावरचे फारसे चित्रपट मला आठवत नाहीत. या चित्रपटात सासरे, जावई आणि नात त्या परिस्थितीला सामोरे जातात. आईच्या नसण्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी खूपच मोठी असते.”
“पण नेमक्या त्या वळणावर एका वडिलांना पुढे येऊन ती पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न करावा लागतो, हा विचार मला खूपच रोचक वाटला. या विषयावर भाष्य करणारे फारसे चित्रपट आपल्याकडे नाहीत, त्यामुळे हा विषय एकदम नवाकोरा आणि छान होता.”
“त्याचबरोबर आम्हाला याचीही जाणीव आहे की, आईची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही; पण तुम्ही तुमच्यातर्फे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करता. प्रत्येक पालकाची आपल्या मुलाच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या कुवतीनुसार किंवा कदाचित त्याहूनही अधिक काहीतरी करण्याची इच्छा असते,” असे या मुलाखतीत अभिषेकने सांगितले.
टोकदार बुद्धी चातुर्य आणि आंबटगोड क्षणांनी काठोकाठ भरलेल्या ‘बी हॅपी’ या चित्रपटाची कथा भावस्पर्शी आहे. शिव नावाच्या सिंगल फादरची, जो त्याच्या धारा नावाच्या हजरजबाबी, पण प्रेमळ मुलीसह आपल्या आयुष्यातील चढ-उतारांना सामोरा जातो. आपली स्वतःची १३ वर्षांची मुलगी आराध्या बच्चनबरोबरच्या आपल्या अनुभवांमुळे शिवची भूमिका अधिक समृद्ध केल्याचे अभिषेक सांगतो.
एक अभिनेता म्हणून नेहमी तुम्ही असं काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असता, ज्यामध्ये तुम्ही भावनिकरित्या गुंतून जाल आणि हे तुम्ही तुमच्या प्रत्येक चित्रपटामध्ये शोधत असता. त्यामुळे तुमचे सगळे चित्रपट हे व्यक्तिगत असतात. पण त्याच्या जोडीला जर तुमच्या आयुष्याशी समांतर असे काही असेल किंवा त्यामध्ये असलेली एखादी भावना जर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवली असेल, तर हे सगळे खूपच सोपे होऊन जाते,” असे हा ४९ वर्षीय अभिनेता म्हणतो.
‘बी हॅपी’ च्या निमित्ताने अभिषेक पुन्हा एकदा वर्मा या बाल कलाकाराबरोबर एकत्र येत आहे, यापूर्वी २०२० मध्ये ‘लुडो’ या कॉमेडी-ड्रामामध्येही त्यांनी एकत्र काम केले होते. गुरु फेम अभिषेक हा पटकथेतील बारकावे समजून घेण्याकडे खास लक्ष देत असल्याचं वर्मा आवर्जून सांगते.
“अभिषेक भैया मला बऱ्याच गोष्टी शिकवत असे. ‘बी हॅपी’ मधील एका दृष्यात माझे दोन संवाद होते, तर अभिषेक भैय्याला खूप संवाद होते. अभिषेक भैयाबरोबर मी तालीम करायची आणि तो त्याची संपूर्ण पटकथा वाचून दाखवायचा. मी त्याला सांगायची की, ‘सगळी पटकथा नको, फक्त शेवटचे बोल आणि मी माझे संवाद बोलते.’ पण अभिषेक भैय्याने मला इतके छान समजावून सांगितले आणि म्हणाला, ‘असं कसं इनायत? तुला संपूर्ण पटकथा वाचलीच पाहिजे.’ मला वाटायचे की ‘मी संपूर्ण पटकथा वाचली आहे, मी तुझेच काम कमी करत आहे.’ तो खूपच जाणकार व्यक्ती आहे.” गुरु स्टारबद्दल बोलताना वर्मा सांगते.
‘बी हॅपी’ मध्ये नोरा फतेही, नास्सर, जॉनी लिव्हर आणि हरलीन सेठी यांच्याही भूमिका आहेत.
हर्षदा वेदपाठक