सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही; डॉक्टर, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
पेडणे : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणारी 108 रुग्णवाहिका जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास कोलवाळ येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण घेऊन बांबोळी येथे 108 रुग्णवाहिका जात होती. दरम्यान कोलवाळ येथे आल्यावर डॉक्टर आणि चालकाला गाडीच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.
चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने गाडी थांबवत रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना गाडीतून बाहेर काढले आणि दूर अंतरावर नेले. त्यानंतर लगेच रुग्णवाहिकेने पेट घेतला आणि बघता बघता पूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
रुग्णवाहिकेत असणाऱ्या डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर मोठी हानी झाली असती. सदर रुग्णवाहिका दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची असून सावंतवाडी उपजिल्हा येथून रुग्ण घेऊन गोवा येथे जात असल्याचीही प्राथमिक माहिती हाती आली आहे. दरम्यान रुग्णवाहिकेने पेट घेतल्यानंतर दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्णाला बांबोळी येथे पाठविण्यात आल्याचेही समजते.