इंटरनेट, संगणक वापरात गोव्याचे लहान उद्योजक अव्वल

ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यानचे सर्व्हेक्षण : इंटरनेट वापरात हरियाणा देशात द्वितीय


18th February, 12:06 am
इंटरनेट, संगणक वापरात गोव्याचे लहान उद्योजक अव्वल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : व्यवसायासाठी इंटरनेट आणि संगणक वापरात गोव्यातील कॉर्पोरेट कायद्याअंतर्गत नोंदणी नसणारे लहान उद्योग देशात आघाडीवर आहेत. केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. यासाठी ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान गोव्याच्या ग्रामीण भागातील ४९३ आणि शहरी भागातील ५१०, अशा एकूण १००३ लहान उद्योगांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते.
या सर्व्हेक्षणात विविध राज्यांतील दर एक हजार लहान उद्योगांत किती उद्योग माल विक्री, ऑर्डर स्वीकारणे व अन्य गोष्टींसाठी इंटरनेट, संगणकाचा वापर करतात याची माहिती गोळा केली होती. यामध्ये लहान उत्पादक, व्यापारी आणि अन्य सेवा पुरवठादारांचा समावेश होता. यानुसार गोव्यात दर एका वर्षात दर एक हजार लहान उद्योगांमागे सर्वाधिक ७४६ उद्योगांनी इंटरनेट, तर २०० उद्योगांनी संगणकाचा वापर केला आहे. इंटरनेट वापरात गोव्यानंतर हरियाणा (५३८ उद्योग), हिमाचल प्रदेश (५१८), महाराष्ट्र आणि उत्तराखंड (प्रत्येकी ४७४), सिक्कीम (४५२), कर्नाटक (४५१) या राज्यांचा क्रमांक लागतो.
देशात मेघालयमधील लहान उद्योगात व्यवसायासाठी इंटरनेटचा वापर सर्वांत कमी म्हणजे दर एक हजार उद्योगांमागे केवळ २७ उद्योगात होतो. यानंतर मणिपूर (२९), मिझोरम (८३), उत्तर प्रदेश (८६), बिहार (१२४) ही राज्ये आहेत. केंद्रशासित प्रदेशात चंदीगड येथे सर्वाधिक ७८२ उद्योगांत इंटरनेटचा वापर होतो. यानंतर दादरा आणि नगर हवेली (६०१), दिल्ली (५४४), लडाख (४४४), पुद्दुचेरी (२०९), लक्षद्वीप (१३४) यांचा क्रमांक लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
संगणक वापरात केरळ दुसऱ्या स्थानी
अहवालानुसार, लहान उद्योगांत व्यावसायिक कारणांसाठी संगणक वापरात गोव्यानंतर केरळचा क्रमांक लागतो. केरळमध्ये दर एक हजार लहान उद्योगांमागे १०३ उद्योग संगणकाचा वापर करतात. यानंतर महाराष्ट्र (१०१), तामिळनाडू (८६) या राज्यांचा क्रमांक लागतो. केंद्रशासित प्रदेशात चंदीगड येथे सर्वाधिक ३९८ लहान उद्योग संगणकाचा वापर करतात.
इंटरनेट वापरात वाढ
अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण देशात आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये लहान उद्योगांत इंटरनेट वापरात वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये ग्रामीण भागातील १३.५ टक्के, तर शहरी भागातील ३०.२ टक्के लहान उद्योग इंटरनेट वापरत होते. २०२३-२४ मध्ये त्यामध्ये वाढ होऊन अनुक्रमे १७.९ टक्के व ३७ टक्के झाले आहे.