अनुभवाचे बोल

लोकवेद आणि लोकगीते ही अनुभवातून जन्मलेले असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिपादित केलेले विवेचन हे काल्पनिक नसून वास्तवाशी समांतर जाणारे असते. म्हणूनच ह्या ओव्या अधिक भावतात, आपल्या वाटतात आणि आयुष्याचे धडे देऊन जातात.

Story: भरजरी |
16th February, 12:09 am
अनुभवाचे बोल

घरणीबाईचा संसार फक्त तिच्या घरापुरता मर्यादित नव्हता. घरातल्या माणसांबरोबरच आप्तेष्ट, शेजारीपाजारी या सर्वांना सोबत घेऊनच ती संसाराची वाट चालत असायची. हा संसार करताना तिला अनेक कटू गोड अनुभव यायचे. हे अनुभव ती आपल्या ओव्यांमधून शब्दबद्ध करायची. काम करताना या ओव्या गाऊन ती आपले मन हलके करायची. 

आपल्या नातेबंधाविषयी बोलताना घरणीबाई चार भिंतीच्या आड एक दुसऱ्यांच्या विरुद्ध कसा भेदभाव केला जायचा हे अगदी मार्मिक पद्धतीने सांगताना म्हणते...

जायेचो बंधू आलो
बस म्हटल्यार बसाना जालो
जायेचो बंधू आलो
मिरा वोल्यो ह्यो तोरी भड्डी 

वरील भेदभाव अजूनही कित्येक घरी जाणवतो. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असायची. ह्या एकत्र कुटुंब पद्धतीत एकमेकांच्या नातलगांविषयी भेदभावाची भावना कशी होती हे सांगताना घरणीबाई म्हणते की घरची कारभारीण घरी असताना दुसऱ्या जाऊबाईचा बंधू घरी आला. जाऊबाई घरी नव्हती त्यामुळे त्याला बसायला सांगितले पण तो काही बसला नाही. जेवणाची वेळ होती. त्याच्या जेवणाची तयारी करायची म्हणून तोरी (कडधान्य) दळू लागले. पण तोरी ओल्या निघाल्या. त्यामुळे त्याचे पीठच निघेना. म्हणून स्वयंपाक करायला वेळ झाला. शिवाय तो लवकर निघाला त्यामुळे त्याचा पाहुणचार करता आला नाही.

असे निमित्त देताना जेव्हा कारभारीन बाईचा भाऊ घरी येतो तेव्हा मात्र तिच्या उत्साहाला सीमा राहत नाही. हे सांगताना घरणीबाई म्हणते,

माजो गे बंधू आलो
दारी सकीर उगवलो
माजो गे बंधू आलो
अशे निस्त्याचे जवनाळ
बंधूंच्या जेवणार
अशे उतारले केळी घड

कारभारणीचा बंधू घरी येताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. भावाच्या येण्यानेतिच्या दारी सकीर म्हणजे जणू सूर्य उगवला असल्याचे तिला भासू लागले. त्याच्या जेवणाची जय्यत तयारी करण्यात आली. तऱ्हेतऱ्हेचे मासे, त्या माशांचे तोंडी लावण्याचे प्रकार रांधण्यात आले. त्याच्या ताटावर परसातल्या केळीचे घड उतरले. म्हणजेच भाऊ आला म्हणून परसातला पिकलेला केळीचा घड त्याच्यासाठी कापून आणला. असा आपल्या भावाचा जय्यत पाहुणचार केला.

एकाच घरच्या दोन सुना. दोघींचा त्या घरावर समान हक्क. दोघींच्याही नातलगांना समान वागणूक द्यावी अशी अपेक्षा प्रत्येक घरातील घरणीबाईला असते. पण ज्याच्या हातात दोरी तो मदारी. अशी परिस्थिती आजच्या घडीलाही आपल्याला कित्येक घरामधून दिसून येते. घरातील एखादा मुलगा पैशाने किंवा मानाने दुय्यम असेल तर करत्या मुलाची अरेरवी घरात चालते. याचा परिणाम म्हणून गरीब मुलगा, त्याचा परिवार आणि त्याच्या नातलगांनाही कसा सोसावा लागतो हे अगदी नेमकेपणाने घरणीबाई आपल्या ओव्यांतून सांगते.

संसारात रमताना घरणीबाईचा हक्काचा आधार म्हणजे तिची शेजारीण. तासनतास त्यांच्या गप्पा रंगणार. आपापली सुखदुःखे एकमेकांना सांगतात. आपल्या चुलीवरचा पदार्थ दुसरीच्या घरी पोहोचवतात. कधी सर्व समक्ष तर कधी चोरून मारून. पण सख्ख्या मैत्रिणी असल्या तरी या शेजारणी कधीकधी पक्क्या वैरिणी बनतात आणि अशावेळी होणारी मजा सांगताना घरणीबाई म्हणते,

शेजीयेन दिली भाजी
भाजी खाऊची गुमाइत
दुसऱ्या महिन्यात
शेजीयेन काढली झगड्यात

शेजारणी बाईने गुपचूप भाजी आणून दिली. थोडीशीच असल्यामुळे तिने सांगितले की तू एकटीच खा इतर कोणाला सांगू नको. धरणीबाईने तिच्यावर विश्वास ठेवून गुमाईत म्हणजेच एकांतात ती भाजी खाल्ली. पण दुसऱ्याच महिन्यात ह्या दोघींचं भांडण झाले आणि शेजारणी बाईने आपण तुला भाजी दिली हे तिचं भांड भांडण करताना फोडलं. यावरून शिकवण घेत घरणीबाई म्हणते की शेजारणीने दिलेली भाजी कधीही अशी चोरून खायची नाही. ती कधी 

आपलं भांड इतरांसमोर उपडे करेल याचा काही नेम नाही.

शेजारणीविषयीची अजून एक गंमत सांगताना घरणीबाई म्हणते,

सीजीयेने गे बाई
येऊ नका गे दोनदा तीनदा
पडलूय तुझ्या छंदा
मीया इसरलूय कामधंदा

कामात व्यस्त असलेली घरणीबाईची कामचोर शेजारीण दिवसाला दोन-तीन वेळा घरणीबाईच्या घरी येते. एकदा आली की त्या दोघींच्याही गप्पा चांगल्याच रंगतात. परिणाम घरणीबाईला आपल्या कामाचा विसर पडतो. पाठोपाठ आपल्या सासुबाईचा रोषसुद्धा तिला सहन करावा लागतो. म्हणून आपल्या 

घरणीबाईला सांगताना ती म्हणते की अशी तू पुन्हा पुन्हा दोन-तीन वेळा येऊ नकोस. तुझ्या मी छंदाला लागून माझा काम धंदा मात्र विसरून जाते. एखाद्या माणसाविषयी आपल्याला त्रास होत असेल, तर स्पष्टपणे सांगण्याचा स्पष्टवक्तेपणा इथे घरणीबाईच्या ओवीतून दिसून येतो.

कधी कधी घरणीबाई आपल्या ओव्यांमधून मोठमोठ्या तत्त्वज्ञानी माणसालाही जमणार नाही असे तत्त्वज्ञान अगदी साध्या सोप्या शब्दांमधून व्यक्त करताना दिसून येते. दोन भावांमध्ये अंतर आणणारी मुख्य व्यक्ती त्या भावांची बायको असते हे आजपर्यंत अनेक पद्धतीने घरणीबाईने अनुभवलेले असते. आपल्या ह्या संसाराच्या अनुभवातून ती एका निष्कर्षावर पोहोचते. घरणीबाई म्हणते,

जायो जायो झगडती
एका केळीच्या पाक्यासाठी
आताचे राज्य पापी
कोणय केसांन  गळो कापी

जावा जावा एका केळीच्या पाक्यासाठी सुद्धा भांडू शकतात. सख्ख्या भावांना पक्के वैरी बनवू शकतात. व्यवस्थित वाटणी करून नांदण्यापेक्षा काही स्वार्थी बायकांमुळे दोन भावांमध्ये कायमची फूट पडताना दिसून येते. त्यामुळे घरणीबाई इतरांना सतर्क रहा म्हणून सांगताना गाऊ लागते की, आताचं राज्य इतकं पापी आहे की भोळ्या माणसाचा कोणीही केसाने सुद्धा गळा कापू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपला भोळेपणा सोडून चतुरपणा आपल्या अंगी बाणावा असेच जणू ती आपल्या ओवीतून सांगत असते.


गाैतमी चाेर्लेकर गावस