आजपासून रंगणार डब्ल्यूपीएल २०२५ चा थरार!

पहिला सामना गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
14th February, 12:34 am
आजपासून रंगणार डब्ल्यूपीएल २०२५ चा थरार!

नवी दिल्ली : वुमन्स प्रीमियर लीगला १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदाचा हा तिसरा सिझन असणार आहे. यावेळी देशातील चार शहरांमध्ये स्पर्धेचे सामने खेळवले जातील.
या स्पर्धेतील पहिले विजेतेपद हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने तर दुसऱ्या सिझनने विजेते पद स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पटकावले होते.
वुमन्स प्रीमियर लीगचे सामने देशातील चार शहरांमध्ये खेळवले जातील, हे पहिल्यांदाच घडणार आहे. ही स्पर्धा वडोदरा येथून सुरू होईल, त्यानंतर हा प्रवास बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचेल, तर यावेळी वुमन्स प्रीमियर लीग सामने लखनौमधील एकाना स्टेडियमवरही खेळवले जातील. अंतिम सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
डब्ल्यूपीएलचा पहिला सामना १४ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना १५ मार्च रोजी खेळला जाणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये एकूण ५ संघ खेळणार आहेत. ज्यात गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे. लीग टप्प्यात, सर्व संघांना एकमेकांविरुद्ध किमान २ सामने खेळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर एलिमिनेटर सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये खेळला जाईल. यामध्ये जो जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचणार आहे.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर वुमन्स प्रीमियर लीग २०२५ हंगामाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. याशिवाय, सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर करण्यात येणार आहे. यावेळी वुमन्स प्रीमियर लीग २०२५ मधील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील तर ७ वाजता टॉस केला जाणार आहे.
आजचा सामना
गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
स्थळ : कोटंबी स्टेडियम, वडोदरा
वेळ : सायं. ७.३० वा.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने प्लस हॉटस्टार