खुशी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बॉनी कपूर यांची धाकटी मुलगी. तिने २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चिस’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘लवयापा’ चित्रपटात तिने जुनैद खानसोबत स्क्रिन शेअर केली. तर धर्मा प्रोडक्शनच्या आगामी ‘नादानियाँ’मध्ये ती इब्राहिम अली सोबत झळकणार आहे. तिच्या कारकिर्दीबाबत केलेली ही बातचित...
तू आधी ओटीटीवर सिनेमा केलास आणि मग मोठ्या पडद्यावर आलीस. दोघांमधील अनुभव कसा अहोता?
नक्कीच चांगला अनुभव होता. माझ्यासाठी हे वेगळेपण ओटीटी आहे म्हणून नाही, तर चित्रपटाची पटकथा फार वेगळी होती. मोठ्या पडद्यावर चित्रपट करताना बॉक्स ऑफिसचे टेंशन असते. दोन्हीतील अनुभव वेगळे आहेत. कारण दोन्ही माध्यमे वेगळ्या आणि शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीने कथानक मांडतात.
एका चित्रपट निर्मात्याची मुलगी म्हणून आपल्या वडिलांकडून काय शिकलीस?
मी त्या बाबतीत फार लक्ष घातला नाही. रोज शाळेत जाण्याप्रमाणे मी सेटवर जाते. मी एक चांगली विद्यार्थीनी आहे. सर्वांचे लक्षपूर्वक ऐकते. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा मी प्रयत्न करते.
‘लवयापा’ तून तू बॉलीवूडमध्ये केलास, याचा काही ताण होता का?
थोडा ताण तर आला. पण मला वाटते की यातच मजा पण आहे. ही सर्व प्रक्रिया माझ्यासाठी नवीन आहे. मला वाटले नव्हते की, मी इतक्या मुलाखती देईन आणि प्रमोशन करेन. त्यामुळे मला यातून खूप शिकायला मिळाले आणि जस जसे मी या प्रक्रियेतून जात आहे, तसे माझ्यासाठी हे सर्व आणखी सहज सोपे होत चालले आहे.
तुझ्यात एक अभिनेत्री आहे हे तुला कधी जाणवले?
मला नेहमीच एक अभिनेत्री व्हायचे होते. लहानपणी मी आणि जान्हवी सेटवर इकडे तिकडे बागडत असायचो. कलाकारांच्या व्हॅनमध्ये जायचो. याशिवाय जेवणाच्या टेबलवर सुद्धा सर्वजण वेगवेगळ्या सिनेमांविषयीच बोलायचे. त्यामुळे नकळत ते संस्कार होत गेले आणि मी अभिनेत्री होणार हे मला माहित झाले.
जेव्हा तुम्ही सर्व भावंडे म्हणजे सोनम, हर्षवर्धन, जान्हवी असे सर्व एकत्र असता तेव्हा तुमच्यात नेमक्या कोणत्या गप्पा होत असतात, आणि तू कोणाला फॉलो करतेस?
तसे मी कोणाला फॉलो करत नाही. मला वाटते की माझ्या मार्गावरून मलाच चालायचे आहे. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. पण आपल्या कामसंबंधी आपल्याच घरात इतकी मते जाणून घेणे ही एक चांगली गोष्ट असते. त्यामुळे तुमचा दृष्टोकोन विस्तारत जातो. खरे सांगू का, आम्ही फिल्म्स विषयी जास्त बोलतच नाही.
‘लवयापा’ या चित्रपटात तुला काही कठीण वाटले का?
नाही आम्ही प्रत्येक वेळी तालीम केली होती. मी पूर्णपणे तयार होते आणि मला आत्मविश्वास सुद्धा होता.
हा चित्रपट स्वीकारण्याआधी तू जान्हवीचा सल्ला घेतला होतास का?
ती या बाबतीत फार हुशार आहे. मी तिला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेत नाही.
दिल्लीची मुलगी साकारताना काय आव्हाने होती ?
आव्हाने? असे काही नव्हते. या चित्रपटात आमच्या फोनवरच्या भांडणाचेच जास्त सीन्स आहेत. आम्ही फार फार तर ६ ते ७ दिवसच एकत्र काम केले असेल.
अमीर खान कधी सेटवर आले होते का?
नाही कधीच नाही.
सिनेसृष्टीत तुला कसा प्रतिसाद मिळत आहे?
सगळेच खूप छान आहेत आणि आमचे चांगले स्वागत होत आहे. छान वाटतेय.
तुला दक्षिणात्य चित्रपट करण्याची इच्छा आहे का?
आता लगेच मी तो विचार करू शकत नाही. जर कथानक चांगले असेल आणि मी त्या भूमिकेत फिट बसत असेन तर मी नक्कीच त्यावर विचार करेन.
एखादा असा दाक्षिणात्य अभिनेता ज्याच्या सोबत तुला काम करायला आवडेल?
असे कोणी स्पेसिफिक नाही.
तुला तामिळ बोलत येते का?
नाही. पण मला समजते. मला तमिळ आणि तेलगू मधला फरक समजत नाही.