चालक जखमी. आज पहाटेची घटना.
वास्को : दाबोळी बोगमाळो चौकात उड्डाण पुलाच्या खांबांसाठी खोदण्यात आलेल्या एका मोठ्या खड्ड्यामध्ये बुधवारी (ता.१२) सकाळी एक टूरिस्ट टॅक्सी कोसळली. खोदकाम करताना तेथील रस्ता वाहनांसाठी योग्यरित्या बंद करण्यात न आल्याने सदर घटना घडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उड्डाण पुलाचे बांधकाम करताना तेथे योग्य खबरादारी घेण्याची गरज असताना कंत्राटदार कंपनीचे अधिकारी व कामगार पूर्णपणे कानाडोळा करीत असल्याने वाहनचालक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज होती. तेच न झाल्यामुळे बुधवारी (ता.१२)सकाळी एक टूरिस्ट टॅक्सी तेथील एका खड्ड्यात कोसळली. सदर रस्त्यावर योग्य बॅरिकेड्स उभारले नसल्याने तो टॅक्सीचालक थेट रस्त्याने आला आणि खड्ड्यात टॅक्सीसह कोसळला. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. सदर टॅक्सीचालक दाबोळी विमानतळावरून एमईएस चौकाकडे निघाला होता.अर्ध्याअधिक रस्त्यावर बॅरिकेड्स घातले आहेत. तथापी ज्या ठिकाणी खड्डा खोदकाम करण्यात आले आहे, त्याठिकाणचा भाग उघडा आहे. तेथे फक्त ‘ट्रॉफिक कोन’ ठेवण्यात आले आहे. ते चालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे चालक आपली वाहने थेट त्या रस्त्याने नेण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ती आता खरी ठरली.
दाबोळी –बोगमाळो चौकात उड्डाण पुलाचे खांब उभारण्यासाठी दोन्ही बाजूंच्या दुपदरी रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले आहे. सदर बँरिकेडस् मुळे रस्ता अतिशय अरुंद झाल्याने वाहनचालकांना कच्चा रस्त्यावरून वाहने चालवावी लागतात. त्या रस्त्यावर पाणी शिंपडण्याऐवजी ओतण्यात येत असल्याने तेथे चिखल होतो. त्यामुळे तो कच्चा रस्ता वाहनांसाठी धोकादायक झाला आहे. एखादे वाहन त्या चिखलातून गेल्यास दुचाकीचालकांच्या अंगावर चिखल उसळतो. प्रशासनाने आणि कंत्रातदाराने यात लक्ष घालावे अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.