३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५
पणजी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या पदकांची संख्या आता १० झाली आहे. मॉडर्न पेंटाथलॉनच्या टेट्राथलॉन पुरुष सांघिक प्रकारात गोव्याला रौप्य प्राप्त झाले. बाबू गावकर, हरिश्चंद्र वेळीप व सूरज वेळीप यांनी शानदार कामगिरी करत गोव्याला रौप्य मिळवून दिले.
उत्तराखंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये गोव्याचे शानदार प्रदर्शन कायम आहे. गोव्याने या क्रीडा प्रकारात आतापर्यंत ४ रौप्य व ३ कांस्य पदकांसह एकूण ७ पदके पटकावली असून गोव्याने एकूण १० पदकांची कमाई केली आहे.
टेट्राथलॉन पुरुष सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मयंक चाफेकर, सौरभ पाटील व जय लवाथे यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांनी एकूण ३,१७९ गुणांची कमाई केली. गोव्याच्या हरिश्चंद्र वेळीप, बाबू गावकर व सूरज वेळीप यांनी २,८३५ गुणांची कमाई करताना रौप्य पदक पटकावले तर हरियाणाच्या बसंत तोमर, सुमीत व मृत्युंजय यांनी २,७५६ गुणांसह कांस्यपदक पटकावले आहे.
गोवा पदकतक्त्यात २६व्या क्रमांकावर
या पदकांबरोबरच गोव्याच्या पदकांची एकूण संख्या आता १० झाली असून गोवा पदकतक्त्यात २६व्या क्रमांकावर आहे. गोव्याने आतापर्यंत या स्पर्धेत स्क्वॉश प्रकारात १ सुवर्ण, योगासनमध्ये १ सुवर्ण, व्हॉलिबॉलमध्ये एक कांस्य व मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये ४ रौप्य व ३ कांस्यपदके पटकावली असून आता पदकांची संख्या १० झाली आहे.
गोव्याच्या संघाचे पेंटाथलॉन प्रकारात वर्चस्व दिसून येत आहे. गतवर्षी गोव्यात झालेल्या पेंटाथलॉनमध्येही गोव्याच्या संघाने चमकदार कामगिरी करताना या प्रकारात ८ पदके पटकावली होती. या स्पर्धेतील लेझर रनमध्ये गोव्यातर्फे शनिवारी मिश्र रिलेमध्ये नेहा गावकर, बाबू गावकर यांना रौप्य, पुरुष वैयक्तिकमध्ये बाबू गावकरला रौप्य व महिला सांघिकमध्ये नेहा गावकर, अंकिता वेळीप व वैष्णवी वडार यांना कांस्य पदक मिळाले होते. आता पुन्हा एकदा गोव्याच्या या खेळाडूंनी मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये पदक मिळवत या प्रकारात पदकांची एकूण संख्या ७ केली आहे.