पात्रांमध्ये डार्क शेड असेल तर सिनेमातली शाहिदची कामगिरी नेहमीच भाव खाऊन जाते. ‘देवा’चा ट्रेलर पाहूनच ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. २०२३ला बॉलीवूडच्या मास फिल्म्सने वर्षभर जो धमाका केला, त्याचाच परिणाम म्हणून गेल्या वर्षापासून प्रत्येक प्रॉडक्शन हाऊस एक परफेक्ट मसाला एन्टरटेनरच्या शोधात आहे.
शाहिद कपूरच्या ‘कमीने’, ‘हैदर’ तसेच ‘आर राजकुमार’, ‘कबीर सिंग’ सारख्या कित्येक चित्रपटांमधून त्याच्यातली सणकीपणा भरलेली एक एनर्जी दिसून येते, जी त्या मास पात्रांना दमदार बनवते. ‘देवा’च्या ट्रेलरमधूनच शाहिदच्या त्या एनर्जीचा अंदाज आला होता. पण खरंच हा चित्रपट स्वतःची छाप प्रेक्षकांवर पाडू शकला का?
‘देवा’च्या कथानकात राग आणि बंदुकीचा ट्रिगर या दोन्ही गोष्टींवर लूज कंट्रोल असलेल्या, गरम डोक्याच्या सणकी कॉपच्या म्हणजेच देव आंब्रेच्या रोलमध्ये असलेल्या शाहिद कपूरचे आयुष्य आपल्या बालपणीचा मित्र आणि सहकारी पोलीस ऑफिसर असलेल्या रोहनच्या हत्येमुळे ढवळून निघते. तो आपल्या सीनियरला फोनवर आपण रोहनच्या मारेकऱ्याचा शोध लावल्याचे सांगत असतानाच त्याचा अॅक्सिडेंट होतो. त्याची स्मरणशक्ती तो यात गमावतो. त्यानंतर देवाला पुन्हा ही केस सोडवून मारेकऱ्याला शोधून काढायची जबाबदारी दिली जाते. आपली स्मरणशक्ती गमावलेला देवा पुन्हा ही केस सोडवू शकतो का? याचे एक धक्कादायक उत्तर देत ‘देवा’ संपतो.
२०१३ला रिलीज झालेल्या ‘मुंबई पोलीस’ या मल्याळम सिनेमाचा हा रिमेक असून त्यात पृथ्वीराज सुकुमारनने मुख्य भूमिका साकारली होती. ‘मुंबई पोलीस’चे दिग्दर्शक रोशन अँड्रयूज यांनीच ‘देवा’चंही दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात शाहिदसोबत पूजा हेगडेनेही तिच्या वाटेला आलेल्या महिला पत्रकाराच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सुरुवातीला उत्सुकता वाढवणारा हा सिनेमा मध्यंतरानंतर थोडासा रटाळ वाटू लागतो मात्र मराठमोळ्या उपेंद्र लिमयेच्या एंट्रीने सिनेमा पुन्हा एकदा मुसंडी मारतो. पवेल गुलाटी, प्रवेश राणा, गिरीश कुलकर्णी आणि कुब्रा सैत यांनी देखील त्यांच्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. अॅक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सने खिळवून ठेवणारा असा हा चित्रपट असून शाहिदच्या इतर अॅक्शनपटापेक्षा हा चित्रपट वेगळा आणि वरचढ जाणवतो.
मनोरंजनाच्या दृष्टीने हा अॅक्शनपट पाहण्याजोगा आहे. पण पटकथेतला ढिसाळपणाही तितकाच नजरेत भरतो. तुम्ही शाहिद कपूरचे जर फॅन असाल तर ‘देवा’ हा एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखा आहे.