जुनैद खानने ‘महाराज’ या यश राज फिल्म्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या सिनेमातून आपली कारकिर्द सुरू केली. त्याला लाभलेली पार्श्वभूमी आणि प्रशिक्षण यामुळे तो सिने इंडस्ट्रीतील एक आश्वासक चेहरा बनला आहे. जुनैद हा एक भारतीय अभिनेता असून तो बॉलिवूडचा सुपरस्टार अमीर खानचा थोरला मुलगा आहे. त्याने फिल्म मेकिंग आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर सिनेजगतात पदार्पण केले. अभिनेता होण्याआधी त्याने या क्षेत्रात पडद्यामागील अनेक भुमिका निभावल्या असल्या तरी त्याचे मुख्य लक्ष्य आणि आवड अभिनयाचीच होती. जुनैद खानशी त्याच्या नव्या सिनेमाविषयी मारलेल्या गप्पा.
प्रश्न : ‘लवयापा’ हा सिनेमा करायचा हे ठरवण्यामागे कोणती प्रेरणा होती?
जुनैद : उमला गोष्टी ऐकायला, बघायला आवडतात. त्यांचे मला आकर्षण आहे. जेव्हा मधूजी हा सिनेमा घेऊन माझ्याकडे आले तेव्हा मी कथा वाचली, मला खूप आवडली. मी त्यांना विचारले की तुम्हाला खरंच या चित्रपटात मला घ्यायचे आहे का? कारण यातील व्यक्तिरेखेप्रमाणे मी नाही.
प्रश्न : महाराज हा तुझा पहिलाच सिनेमा होता. आव्हानात्मक भूमिका होती. तुला कधी वाटले तू ही भूमिका निभावून नेशील? तुझी व्यक्तिरेखा फार दमदार होती यावर दुमत नाही.
जुनैद : तुमच्या प्रशंसेसाठी धन्यवाद. खूप विचार करून मी ती भूमिका निवडली, त्याबद्दल वडिलांचे मत देखील विचारात घेतले. विषय वेगळा होता त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला ते सगळेच एक आव्हानात्मक होते. या विचारातच चित्रपट स्वीकारला. खरं सांगायचे तर सगळ्या टीमने अतिशय उत्तम काम केले आहे.
प्रश्न : ‘महाराजा’ आणि क्षलवयापा’ या दोन्ही व्यक्तिरेखेपेक्षा तुझे व्यक्तिमत्व अगदी वेगळे आहे?
जुनैद : होय. तीच तर अभिनय या विषयाची ताकद आहे. जे तुम्ही नाही ते पडद्यावर साकारणे आणि प्रेक्षकांना आपल्यावर विश्वास ठेवायला लावणे यालाच मला वाटत अभिनय म्हणतात. ‘लवयापा’ बद्दल बोलायचे तर, तुम्ही हा सिनेमा आधी बघा. आपण जर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या बाबत मुलाखत करुया.
प्रश्न : तुझ्या वडिलांनी तुम्हाला कोणत्या टीप्स दिल्या आहेत?
जुनैद : मला काही विचारायचे असेल तर ते नक्कीच मला मार्गदर्शन करतात. तसे ते कधी कोणाला फार काही सांगायला जात नाहीत.
प्रश्न : तू पहिल्यांदा तुझ्या वडिलांसोबत सेटवर कधी गेला होतास?
जुनैद : मला नक्की आठवत नाहिये. पण बहुतेक ‘सरफरोश’ आणि ‘मन’च्या सेटवर मी गेलो होतो.
प्रश्न : सेटवरच्या आठवणी आम्हाला सांगशील?
जुनैद : तशा काही खास आठवणी नाहीत. कारण जर तुम्ही सेटवर काही काम करत नसाल तर (हसून) ते सर्व कंटाळवाणे असते.
प्रश्न : मी तूला तेव्हापासून पाहते आहे जेव्हा तू कौसरशी जोडला गेला होतास. तेव्हापासून तुझा प्रवास सुरू झाला होता. तू कौसरशी जोडला गेलास तेव्हाच अभिनयात करिअर करण्याचा विचार केला होता का?
जुनैद : मी २०१७ मध्ये कौसरमध्ये भुमिका केली होती. मी ‘मदर करेज अँड द चिल्ड्रन’ हे नाटक करीत होतो. त्याआधी एक वर्ष मी अमेरिकेत नाट्यशास्त्राचा अभ्यास करीत होतो आणि तिथेच कामही केले. मग मी २०१७ साली मुंबईत परतलो. तेव्हा मला नाटक करायचे होते. हे लोक तेव्हा ‘मदर करेज अँड द चिल्ड्रन’साठी ऑडिशन्स घेत होते. ऑडिशन दिली. अमेरिकेत अभ्यास करत असतानाच मला अभिनेता बनायचे होतं. ते स्वप्न येथे साकार झाले.
प्रश्न : जुनैद तुझे आजाद (किरण राव यांचा मुलगा), रिनाजी (जुनैदची आई आणि आमिर खानची पहिली बायको) आणि किरणजी (आमिर खान यांची दुसरी बायको) सोबत नाते कसे आहे?
जुनैद : आजाद हा खूपच गोड मुलगा आहे. तो आता शाळेत जातो. आता त्याच्या मित्रांचे एक वर्तुळ आहे. त्याला त्याच्या मित्रांची संगत आवडते. माझं म्हणाल तर मी आजही, मम्माज बॉय आहे.
प्रश्न : तू स्वत:ला एक अभिनेता म्हणून पाहतोस की एक हिरो म्हणून?
जुनैद : असा कोणताही टॅग मी स्वत:वर लावू इच्छित नाही. मला फक्त काम करायचे आहे. हे वर्ष खूपच छान गेले. आणखी दोन फिल्म्स आहेत.
प्रश्न : अमीर खान यांच्या एखाद्या सिनेमाचा रिमेक करायचा असेल तर कोणता सिनेमा तुला करायला आवडेल?
जुनैद : कोणताच नाही. कारण त्यांनी चांगलेच चित्रपट केले आहेत. दुसऱ्या कोणी केले तर ते वाईट होतील.
प्रश्न : तु मन्सूर खान यांच्यासोबत कामाविषयी चर्चा करता का?
जुनैद : नाही, फार नाही. मन्सूर काका चित्रपटांविषयी फार बोलत नाहीत.