‘रोशन्स’च्या निमित्ताने वारसा जपण्याचा प्रयत्न

Story: मुलाखत । हर्षदा वेदपाठक |
31st January, 12:39 am
‘रोशन्स’च्या निमित्ताने वारसा जपण्याचा प्रयत्न

अनेक हिट गाण्यांमध्ये संगीत देऊनही रोशन यांचे नाव कधी घेतले जायचे नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा अभिनेता, दिग्दर्शक राकेश रोशन व्यथित झाला आणि त्याने आपल्या वडिलांचा संगीत वारसा  तसेच आपल्या कामाची आणि आपल्या संगीतकार भावाची माहिती, नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला. त्याच्या या प्रयत्नाला मदत केली ती, त्याचे मित्र दिग्दर्शक शशी रंजन याने आणि दोघांनी मिळून ‘रोशन्स’ ही वेब सिरीज तयार केली. त्या निमित्ताने या दोघांबरोबर मारलेला गप्पा...
दिग्दर्शक शशी रंजन

या सर्व चित्रीकरणात अशी कोणती गोष्ट होती जी टाळावी लागल्याने तुम्हाला खूप वाईट वाटले?
अशा शंभर गोष्टी आमच्याकडे आहेत. ज्या आम्हाला टाळाव्या लागल्या. आमच्याकडे ही डॉक्युमेंटरी एडीट केल्यानंतरही शंभर तासांचे चित्रीकरण बाकी आहे.
राकेशजींचा प्रवासाबद्दल काय सांगाल?
या डॉक्युमेंटरीमध्ये काही भाग असे आहेत, जे केवळ राकेशजींवर आहेत. त्यांनी बॉलीवूडमध्ये जो संघर्ष केला, जो अपमान सहन केला ते दाखवण्यात आले आहे. 
तुम्ही भाग वाढवण्याचा विचार का केला नाहीत?
आम्ही या चार लोकांवर चारच एपिसोड बनवायचे या गोष्टीवर ठाम होतो. ऋतिकचा प्रवास सुद्धा फार मोठा आहे. आमच्याकडे वेळ फार थोडा होता आणि आता आम्हाला आशा आहे की प्लॅटफॉर्म यावर विचार करेल.
हा डॉक्यु – ड्रामा बनवायला तुम्हाला किती दिवस लागले?
दोन वर्ष. यात खूप संशोधन करायचे होते. काही ऐतिहासिक तथ्य व्यवस्थित मांडणे आवश्यक होते. या विषयाशी संबंधित लोक, त्यांच्या आयुष्यातील चढ उतार शोधणे, हे फार कठीण होते. माहिती मिळवणे फार कठीण नव्हते. पण त्यातील भावना साकार करणे फार महत्त्वाचे होते. लोक अशा बाबतीत फार मोकळेपणाने बोलत नाहीत. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि मनापासून एखादी फिल्म करत असाल तर तुम्हाला मेहनत करावीच लागते.
अभिनेता, दिग्दर्शक राकेश रोशन

डॉक्युमेंटरी बनवण्याची प्रक्रिया कशी सुरु झाली?
माझ्या वडिलांनी अत्यंत श्रवणीय संगीत देऊन गाणी तयार केली. आम्ही रेडीओवर सर्व गायकांनी गायलेली गीतकारांची, संगीतकारांची गाणी ऐकायचो. पण त्यात माझ्या वडिलांचे नाव कुठेच नसायचे. मला याचे खूप वाईट वाटायचे की, माझ्या वडिलांनी इतके सुंदर संगीत दिले, तरी त्यांनी माझ्या वडिलांचे नाव घेतले नाही. मला माझ्या वडिलांसाठी काही तरी करायचे होते. मी जेव्हा शशीला भेटलो तेव्हा ते माझ्या वडिलांचे गाणे गुणगुणत होते. मी त्यांना म्हटले की मला माझ्या वडिलांवर काहीतरी बनवायचे आहे. मग त्यांनीच मला ही कल्पना सुचवली आणि आम्ही यावर काम करायला सुरुवात केली. आम्ही एक सर्व रोशन्स वर डॉक्युमेंटरी बनवण्याचा विचार केला. ज्यात माझे वडील प्रामुख्याने दाखवले जातील. त्यांचा वारसा कसा सुरु झाला आणि पुढच्या पिढीने तो कसा जपला हे दाखवले जाईल.
यात फक्त चार एपिसोड्स आहेत, या विषयी तुम्हाला खंत वाटते का?
आमच्याकडे शंभर तासांचे मटेरियल तयार झाले. आम्हाला ते बरेच कापावे लागले. याचे आम्हाला खूप वाईट वाटले पण त्याला इलाज नव्हता.
तुम्हाला तुमच्या अगदी जवळच्या मित्राची, म्हणजे ऋषी कपूर यांची उणीव भासली का?
हो अर्थातच. त्याला या विषयावर बोलायला आवडले असते. तो यावर खूप भरभरून बोलला असता.
तुमच्या आयुष्यात तुम्ही अनेक संघर्षांचा सामना केला आहे. आज जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, तेव्हा एक अभिनेता, एक निर्माता आणि एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटते?
जेव्हा माझे वडील वारले, त्यावेळी आमच्याकडे काहीही नव्हते. मला माझे आयुष्य शून्यातून सुरू करावे लागले. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे माझा आयुष्याचा प्रवास सुरू झाला. पाच वर्षे मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि त्यावेळी माझा महिन्याचा पगार होता शंभर रुपये. एखाद्या अंधाऱ्या बोगद्यातून माझा प्रवास सुरू होता. ज्यात भविष्याविषयी काहीच कल्पना नव्हती. पण मला एक अभिनेता म्हणून ब्रेक मिळाला आणि माझा एक नवा प्रवास सुरू झाला. असे असूनही मला त्यातून समाधान मिळाले नाही. माझे चित्रपट लोकांना आवडत होते, माझ्या कामाचेही कौतुक होत होते. पण माझे करिअर पुढे सरकत नव्हते. मग मी सहकलाकार म्हणून काम करू लागलो. खलनायकाच्या भूमिका करू लागलो. मला असे वाटत होते की, मी सतत लोकांच्या नजरेत राहिले पाहिजे, माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचत रहावा. जेणेकरून माझे अस्तित्व लोकांना जाणवले पाहिजे. मग मी चित्रपट निर्मिती करू लागलो. मी चार ते पाच चित्रपटांची निर्मिती केली. पण त्यातही मला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मग मला समजले की मला दिग्दर्शन केले पाहिजे. मला त्यात खूप रस होता आणि त्यात उतरल्यानंतर मग मागे वळून पाहिले नाही. सर्व काही लीलया होत गेले, कदाचित मी त्यासाठीच बनलो होतो.
तुम्हाला एक हिरो म्हणून तुम्हाला यश मिळाले नाही? याबाबत काय वाटते?
काय झाले, ते मला माहित नाही. पण ते झाले एवढे नक्की. मला ते यश तेव्हा मिळाले नाही. कदाचित ते माझ्या नशिबात नव्हते. मला प्रकर्षाने जाणवते की, चित्रपट क्षेत्रात नशिबाचा वाटा फार मोठा असतो. अभिनय करण्याच्या बाबतीत तुम्ही किती देखणे आहात याला फार महत्त्व नसते. तुम्ही सुंदर दिसत असलात तरी तुमचा चांगला अभिनयच तुमच्या दिसण्याला उठाव आणतो. आजकाल अनेक देखणे अभिनेते आहेत. पण जर त्यांना अभिनय जमला नाही, भावभावना प्रदर्शित करण्यात त्यांच्यात उणीव असेल, तर त्या चांगल्या दिसण्याचा काहीच उपयोग होत नाही. या क्षेत्रात ८० टक्के वाटा हा नशिबाचा असतो तर २० टक्के तुमचे कठोर परिश्रम असतात. पण ते २० टक्के परिश्रम हे १०० टक्क्यांहून जास्त असतात. परिश्रम, वक्तशीरपणा, सातत्य आणि प्रामाणिकपणा यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात आणि तुमचा अभिनय उठावदार होतो. असे अनेक लोक आहेत जे दिसायला चांगले नसतीलही पण त्यांचा अभिनय त्यांना सुंदर आणि देखणे बनवतो.
तुम्ही अनेक महिला केंद्रित चित्रपट बनवले आहेत. यामागची प्रेरणा तुमची आई आहे का?
नाही. तो तो विषय मला त्यावर काम करायला प्रेरित करतो. श्रीदेवी ही उच्चवर्णीय नृत्यांगना म्हणून आणि मिथुन एक कनिष्ठ जातीतील मुलगा म्हणून मी दाखवले आणि दोघांमधले प्रेमसंबंध मी दाखवले. कामचोरमध्ये मी एक पंडित होतो. यात कास्टिंग ठिक नव्हती, पण याची कथा खूप चांगली होती. या विषयावर मला एक चित्रपट बनवायचा होता. जेव्हा मी खुदगर्ज बनवला, तेव्हा ती दोन मित्रांची कथा होती आणि मला एकाच विषयावर पुन्हा चित्रपट बनवायला आवडत नाही. प्रत्येक जण मला दोन मित्रांवर चित्रपट बनवायला सांगत होते. पण अगदी वेगळ्या विषयावर चित्रपट बनवण्याचे आव्हान स्वीकारायला मला आवडते. मग मी महिला केंद्रित चित्रपट बनवला ‘खून भरी मांग’. माझे सर्वच चित्रपट असेच बनलेत आणि ते प्रचंड यशस्वी ठरलेत. मी प्रत्येक वेळी जेव्हा स्वत:लाच आव्हान करायचो तेव्हा मला थोडी भीतीही वाटायची की मी पुढचा सिनेमा करू शकेन की नाही. पण यामुळेच माझा प्रत्येक चित्रपट वेगळा झाला. प्रत्येक वेळी एक नवी कथा मी घेतली. मी कधीही आधीची कथा पुन्हा आणली नाही.
आता तुम्ही चित्रपट बनवणे का थांबवले?
कोण म्हणते मी थांबलो आहे? मी फक्त थोडी विश्रांती घेत आहे. माझे काम सुरू आहे. मला वर्षाला १० चित्रपट देण्याच्या शर्यतीत उतरायचे नाही. आम्ही लवकरच ऋतिकच्या ‘क्रिश ४’ या चित्रपटाची घोषणा करणार आहोत.
नुकतेच सैफ अली खानवर हल्ला झाला. बॉलीवूड स्टार्सना सहज लक्ष्य केले जाऊ शकते असे तुम्हाला वाटते का?
मी सुद्धा काही वर्षांपूर्वी अशा वाईट अवस्थेतून गेलो आहे. सैफ सोबत जे काही झाले ते वाईट होते.