पाकिस्तान : सौदी अरेबिया आणि यूएईसह सात देशांनी तब्बल २५८ पाकिस्तानींना मायदेशी पाठवले

विसा नियमांचे उल्लंघन करणारे, भिकारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर केली कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th January, 01:30 pm
पाकिस्तान : सौदी अरेबिया आणि यूएईसह सात देशांनी तब्बल २५८ पाकिस्तानींना मायदेशी पाठवले

इस्लामाबाद : जागतिक पातळीवर नाचक्की होत असतानाच पाकिस्तानला पुन्हा  शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडली आहे.  गेल्या २४ तासांत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि चीनसह एकूण सात देशांनी तब्बल २५८ पाकिस्तानी नागरिकांना परत मायदेशी पाठवले आहे.

पाकिस्तानी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या २५८  लोकांपैकी २४४ जणांना वैध कागदपत्रांच्या अभावाच्या आधारे विविध देशांतून हद्दपार करण्यात आले. यापैकी केवळ १४ जणांकडे वैध पाकिस्तानी पासपोर्ट आणि इतर कागदपट्रे होती. यांपैकी केवळ १६ जणांना रीतसर अटक करण्यात आली आहे. 

एकट्या सौदी अरेबियाने २३२ लोकांना हद्दपार केले, यात सात भिकाऱ्यांचा समावेश आहे, तसेच विशेष परवानग्यांशिवाय हज करताना पकडलेल्या लोकांना त्यांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर परत पाठवण्यात आले. 

याशिवाय, शिवाय व्हिसा नियमांचे उल्लंघन करून येथे वास्तव्यास असलेल्या लोकांचाही यात समावेश आहे. १२१ लोकांवर त्यांच्या प्रायोजकांच्या तक्रारीच्या आधारे तर ६३ जणांवर इतर आरोप लावण्यात आले.  दरम्यान संयुक्त अरब अमिरातीने २१ जणांना हद्दपार केले. यातील चार जण अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतले होते, तर चीन, कतार, इंडोनेशिया, सायप्रस आणि नायजेरियाने प्रत्येकी एका पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले आहे. 

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानातून मोठ्या संख्येने असे तापदायक प्रवासी परदेशात गेले आहेत. हे लोक निर्वासित, अवैध ड्रग्ज तस्कर, भिकारी आणि मानवी तस्कर म्हणून बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहत आहेत. दरम्यान, सौदी अरेबियात प्रवास करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठी पोलिओ लसीकरण प्रमाणपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. येथील नागरी उड्डाण प्राधिकरणाने ही घोषणा केली. प्राधिकरणाच्या मते, जो कोणी नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करेल त्याला कठोर दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

अफगाणिस्तानसह, पाकिस्तान हा जगातील शेवटच्या दोन पोलिओ ग्रसीत देशांपैकी एक आहे. पाकमध्ये पोलिओव्हायरसच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ दिसून आली आहे. २०२४ मध्ये, ६८ प्रकरणे नोंदवली गेली. यापूर्वी, संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानमधील व्हिसा अर्जदारांना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले होते. विशेष म्हणजे सौदी अरेबिया व्यतिरिक्त, संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशांनी पाकिस्तानमधील किमान ३० वेगवेगळ्या शहरांतील लोकांना विसा देण्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.

हेही वाचा