प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेला राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल याच महिन्यात करण्याचे भाजप श्रेष्ठींनी निश्चित केले आहे. मंत्रिमंडळातून कुणाला हटवायचे आणि कुणाला घ्यायचे याबाबत दिल्लीत खलबते सुरू असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी गुरुवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना वगळून त्या जागी दोन आमदारांना मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे. पक्ष श्रेष्ठींकडून मान्यता मिळताच दोन मंत्र्यांना डिच्चू देऊन दोन नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. महाराष्ट्रासह इतर राज्यातील विधानसभा निवडणुका होऊन पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. संसदेचे अधिवेशन २० डिसेंबर रोजी संपत आहे. यानंतर मुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्षांची सल्लामसल्लत करून श्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सरत्या आठवड्यात बरेच मंत्री तसेच आमदारांनी दिल्ली वाऱ्या केलेल्या आहेत. मंत्र्यांची कामगिरी आणी पक्षाच्या पुढील वाटचालीचा विचार करून कोणाला वगळायचे आणि कोणाला मंत्री करायचे याचा निर्णय होणार आहे.