पत्नी, सासरच्या लोकांना कंटाळून इंजिनीयर तरुणाची आत्महत्या

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th December, 12:34 am
पत्नी, सासरच्या लोकांना कंटाळून इंजिनीयर तरुणाची आत्महत्या

बंगळुरू : पत्नी आणि सासरच्या लोकांना कंटाळून बंगळुरूतील एका इंजिनीयर तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आत्महत्येआधी या तरुणाने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याच्यासह त्याच्या आईवडिलांना कसा त्रास दिला, याची सविस्तर माहिती त्याने व्हिडिओद्वारे दिली आहे.

अतुल सुभाष याच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्याच्याकडून तीन कोटी रुपये मागितल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला आहे. तसेच त्याच्या पोटच्या मुलाला भेटण्याकरता ३० लाखांची अतिरिक्त मागणी केल्याचाही आरोप त्याने केला आहे. त्याने शेवटी पोलिसांना आवाहनही केले आहे. आपल्या मृतदेहाशेजारी त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींना उभेही करू नका, असे तो म्हणाला आहे. आपल्याला न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करू नयेत, अशीही त्याने मागणी केली आहे. एवढे सर्व होऊनही जर आरोपींना मुक्त केले गेले, तर माझी राख न्यायालयाजवळील गटारात टाकून द्या, अशी उद्विग्नताही त्याने व्यक्त केली आहे. त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जवळपास एक तासाचा असून त्याने अनेक आरोप केले आहेत. हे आरोप खरे असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

अतुल सुभाष हे मूळ उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांनी २०१९ साली सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेल्या निकिता यांच्याशी विवाह केला होता. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर ते वेगळे झाले होते. सुभाष यांच्याविरोधात खून, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील काही गुन्ह्यात अतुल सुभाष यांच्या कुटुंबियांचीही नावे दाखल झाली होती. सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. तसेच ८१ मिनिटांचा व्हिडिओही तयार केला. उत्तर प्रदेशच्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीशांनी पत्नीची बाजू घेतल्याचाही आरोप अतुल सुभाष यांनी केला आहे.

हेही वाचा