१४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित
मुंबईः महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची, हा मोठा पेच भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांसमोर आहे. भाजपच नाही तर अन्य दोन पक्षांमधील काही दिग्गजांना धक्का दिला जाऊ शकतो. प्रत्येक पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. शिंदे सरकारमध्ये २९ कॅबिनेट मंत्री होते त्या सगळ्यांनाच संधी दिली जाणार नाही. महायुतीचे तिन्ही नेते आज बुधवारी दिल्लीत जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तिन्ही नेते दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीअंती शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील या बैठकीनंतर शिवसेनेला १२ मंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदांसाठी बरेच दिवस प्रेशर गेम खेळला असून शिंदे गटाच्या वाट्याला १३ ते १४ मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे. १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांत खातेवाटपही निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.
अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजपसह शिवसेनेचा विरोध
विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन संपल्यावर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली आहे. महायुतीतील आमदारांच्या मनात मंत्रिपदावरुन धाकधूक वाढली आहे. अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजप आमदारांसह शिवसेना आमदारांचाही विरोध असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे आमदारही संभ्रमात
एकीकडे शिवसेनेचे मंत्री टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे भाजपच्या आमदारांची अवस्थाही वेगळी नाही. दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्याने भाजपचीही यादी लटकल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती. पुढच्या काही तासात दिल्लीत काही हालचाली घडणार की, आणखी वेळ लागणार याकडे संभाव्य मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचेही टेन्शन वाढले आहे.