मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : होंडा, पिसुर्ले, भिरोंडा, मोर्ले पंचायत क्षेत्र होणार टँकरमुक्त
वाळपई : केरी, मोर्ले, पर्ये, होंडा पिसुर्ले व भिरोंडा अशा पाच ग्रामक्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मोर्ले या ठिकाणी स्वतंत्र १५ एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सत्तरी तालुका टँकरमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हा टप्पा महत्त्वाचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांच्या प्रयत्नातून सदर प्रकल्पाला सरकारकडून मान्यता मिळालेली आहे.
सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची समस्या जटिल आहे. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सत्तरी तालुका हा टँकरमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्ये मतदारसंघातील एकूण आठ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मोर्ले या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सरकारकडून याला मान्यता मिळालेली आहे. एकूण १५ एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प मोर्ले येथे उभारण्यात येणार असून त्याचा शुभारंभ सोमवारी होणार आहे. पाच ग्रामपंचायतींसाठी हा प्रकल्प समाधानकारक आहे. सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाचही पंचायत क्षेत्रतील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
केरी सत्तरी येथे स्वतंत्र पाणी प्रकल्प आहे. तरीसुद्धा सदर गावांमध्ये अजूनही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होत असते. पर्ये पंचायत क्षेत्रासाठी साखळी पाणी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, अनेक वेळा समाधानकारक पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने निर्माण होत असते. होंडा, पिसुर्ले, भिरोंडा या भागामध्ये दाबोस पाणी प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र, अनेक वेळा असमाधानकारक पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सदर पाणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित भागांना २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दाबोस पाणी प्रकल्पावरील ताण कमी होणार
दाबोस या ठिकाणी कार्यरत असलेल्या १५ एमएलडी पाणी प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा होंडा पिसुर्ले, भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्राला होतो. मोर्ले या ठिकाणी सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दाबोस पाणी प्रकल्पावरील ताण कमी होणार आहे. यामुळे इतर भागांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.