दाडाचीवाडी धारगळ येथील घटना
पेडणे : प्रवासी बसला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने खडी क्रशर वरील भुकटी घेऊन म्हापसाच्या दिशेने जाणारा एक ट्रक दाडाचीवाडी धारगळ येथील हनुमान मंदिर शेजारील मुख्य रस्त्यावर कलंडला. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. दरम्यान, मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
पेडणे तालुक्यातील नागझर येथील मुख्य रस्त्यावरून प्रवासी खासगी बस प्रवाशांना घेत पुढे जात होती. त्याच्या मागून खडी क्रशरवरील भुकटी घेऊन जाणारा ट्रक (जीए ०३ व्ही. ५९०६) म्हापशाच्या दिशेने सुकेकुळणमार्गे जात होता. पुढे गेल्यावर दाडाचीवाडी येथील एकेरी मार्गावरून पुढे हनुमान मंदिरच्या अलिकडे काही मीटर अंतरावर एक ट्रक मुख्य रस्त्यावर कलंडला होता. त्यामुळे एका बाजूने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
याबाबत ट्रकच्या चालकाकडे चौकशी केली असता, मी आणि एक खासगी प्रवासी बस नागझर येथून एकाच मार्गाने म्हापशाच्या दिशेने जात होतो. दाडाचीवाडी येथील मुख्य रस्त्यावरील एकेरी मार्गावर पुढे काही अंतरावर बसने अचानक ब्रेक लावला. ट्रक बसवर आदळणार म्हणून ब्रेक मारल्यावर ट्रक रस्त्यावर आडवा झाला, असे त्याने सांगितले.
दरम्यान, प्रवासी घेऊन जाणारी बस आपल्या नियंत्रणात असताना अचानक ब्रेक मारला असता तर त्या मागून येणाऱ्या ट्रकने ब्रेक मारल्याची निशाणी त्या मार्गावर दिसून आली नाही. मात्र, बसला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादात वाहनावरील चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला असावा, असे प्रत्यक्षदर्शी लोकांचे म्हणणे आहे. सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही.