काजूमळ- मोले येथे बेकायदेशीरपणे रेती उपसा

व्यावसायिकांची धावपळ : गुन्हा दाखल करण्यात पोलिसांना अपयश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th December, 10:06 pm
काजूमळ- मोले येथे बेकायदेशीरपणे रेती उपसा

फोंडा : काजूमळ- मोले येथे बेकायदेशीरपणे रेती उपसा करण्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रेती व्यवसायात गुंतलेल्यांची धावपळ उडाली. मात्र, अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यात कुळे पोलिसांना अपयश आले आहे. गुरुवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अजूनपर्यंत उपसा केलेले रेतीचे ढिगारे तसेच पडून आहेत. मात्र, पोलीस तैनात ठेवल्याने रेती माफियांचा नाईलाज झालेला आहे. रेतीची वाहतूक करण्यासाठी राजकीय दबाव वाढत असून गुन्हा नोंद झाला नसल्याने स्थानिक लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

काजूमळ भागात मोठ्या प्रमाणात दूधसागर नदीतील रेती उपसा करण्यासाठी रेती माफियांनी खास परप्रांतीय कामगारांना पाचारण केले होते. गुरुवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परप्रांतीय कामगार सकाळी नदीजवळ आले होते. पण कुळे पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहचल्यानंतर काही परप्रांतीय कामगारांना वाहनातून नेण्यात आले असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. पण पोलीस स्थानकात अजूनपर्यंत कामगारांना ताब्यात घेतल्याची नोंद झाली नसल्याने स्थानिक लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. शुक्रवारी सकाळी तालुक्याचे मामलेदार प्रतापराव नाईक देसाई व कुळे पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली होती. त्यानंतर परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी परिसरात पाहणी केली असता नदीच्या काठावर उपसा करण्यात आलेली अंदाजे ४-५ ट्रक रेती तशीच पडून आहे. तर उपसा करण्यात आलेले दोन रेतीचे ढिगारे वाहतूक करण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान, काजूमळ पासून काही अंतरावर असलेल्या सांगोड येथील दूधसागर नदीतील सुद्धा रेती उपसा करण्यात येत आहे. सांगोड गावातील पैलतीरी असलेल्या करमणे- किर्लपाल भागात रेती उपसा करून रेती सांगोड भागातून वाहतूक केली जाते. त्यासाठी कामगारांना नदीच्या पाण्यातून रेती डोक्यावर घेऊन सांगोड परिसर गाठावा लागतो. गुरुवारी बेकायदेशीरपणे रेती उपसा करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अंदाजे ३०-३५ कामगारांना इतर ठिकाणी लपवून ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय रेती माफिया गावात फिरून स्थितीचा आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा रेतीची वाहतूक परिसरातून होण्याची शक्यता वाढली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने रेती व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींनी राजकीय आश्रय घेतल्याचे बोलले जात आहे. गावाजवळ असलेल्या नदीतील रेती स्थानिक लोकांनी अपल्या घरासाठी वापरण्यात स्थानिक लोकांची हरकत नाही. पण बाहेर गावातील रेती माफिया गावात येऊन रेती व्यवसाय करीत असल्याने स्थानिक लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी परप्रांतीयांना नेले कोठे?

गुरुवारी सकाळी काजूमळ परिसरातील दूधसागर नदीवर रेती उपसा करणाऱ्या काही परप्रांतीय कामगारांना कुळे पोलीस वाहनातून नेताना ग्रामस्थांनी पाहिले होते. पण पोलिसांनी अजूनपर्यंत कुणालाच ताब्यात घेतले नसल्याने पोलीस वाहनातून परप्रांतीय कामगारांना कुठे घेऊन गेले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा