वास्को : आपल्या हँडबॅगमधून प्रतिबंधित जीपीस उपकरण नेणाऱ्या कॅनडाचे नागरिकत्व असलेल्या लेविस क्रिस्तिना या महिलेविरोधात दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद करुन उपकरण जप्त केले. सदर उपकरण नेण्यासाठी कोणतीही परवानगी तिच्याकडे नव्हती. याप्रकरणी उपनिरीक्षक प्रथमेश पालकर पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाचे नागरिकत्व असलेली परंतु सध्या अमेरिकेत राहणारी क्रिस्तिना दि. ५ डिसेंबरला सायंकाळी दाबोळी विमानतळावरुन कोचीला जाण्यासाठी आली होती. विमानतळावरील सिक्युरिटी गेट क्रमांक तीन वर सामानाची तपासणी करताना तिच्या हँडबॅगमध्ये जीपीएस उपकरण असल्याचे आढळून आले. तिच्याकडे सदर उपकरण नेण्यासंबंधी परवानगी पत्रासंबंधी विचारणा करण्यात आली. तथापी तिच्याकडे अशाप्रकारची कोणतीही परवानगी नसल्याचे उघड झाले. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे हेमेंद्र प्रजापती यांनी दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकात तक्रार केली. याप्रकरणी तिच्या विरोधात इंडियन वायरलेस टेलेग्राफी कायदा १९३३ च्या ६(१ अ) व इंडियन टेरेग्राफ कायदा १८८५ च्या कलम २० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तिला नोटीस देण्यात आली आहे.