हैदराबाद : हैदराबादमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार अल्लू अर्जुन बुधवारी रात्री संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आला होता. आरटीसी एक्स रोड येथील थिएटरबाहेर जमलेल्या चाहत्यांना अल्लू अर्जुनला भेटायचे होते.
यादरम्यान अचानक अनेक जण एकमेकांवर पडले चेंगराचेंगरी झाली. यात काही लोक जखमीही झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. जमाव शांत झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी एका महिलेला मृत घोषित केले. सध्या मृत महिलेची ओळख पटलेली नाही. जखमी झालेल्या अन्य तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार; अल्लू अर्जुन स्क्रिनिंगदरम्यान वेळेवर पोहोचला नाही. त्यामुळे चाहत्यांची चलबिचल वाढली. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांना परिस्थिती योग्यरीत्या हाताळता आली नाही असे प्रत्यक्षदर्शी म्हणाले.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राइज' हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. देशातील अनेक भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात ३१३ कोटी आणि जगभरात ३५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलगू चित्रपटांच्या यादीत तो सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.