'डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स ऑफ ग्लोबल स्केल' उपक्रमांतर्गत रक्कम मंजूर
बेळगाव : श्री रेणुका येल्लम्मा देवी मंदिर असंख्य यात्रेकरूंसह गोव्यातील सर्वाधिक भेट देणारे आध्यात्मिक स्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. या मंदिराच्या विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने १०० कोटी रुपये मंजूर केल्यामुळे या मंदिराला मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्राने त्यांच्या 'डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स ऑफ ग्लोबल स्केल' उपक्रमांतर्गत ही रक्कम मंजूर केली आहे. हा प्रकल्प राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य २०२४-२५ योजनेचा भाग आहे.
बेळगांवचे खासदार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त केले.
त्यांनी मंदिराचे सांस्कृतिक महत्त्व आणि मोठ्या संख्येने भाविकांना पाठिंबा देण्यासाठी चांगल्या सुविधांची आवश्यकता बाबी मांडल्या. गेल्या महिन्यात शेट्टर यांनी शेखावत यांची भेट घेऊन प्रकल्पाची बाजू मांडली होती. या योजनेअंतर्गत निवडलेल्या कर्नाटकातील दोन धार्मिक स्थळांपैकी हे मंदिर आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी खर्च:-
या अनुदानामुळे मंदिरातील अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी खर्च केला जाणार आहे. यामुळे पर्यटकांना सोयीसुविधा मिळणार असून या उपक्रमाचा लाभ कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील हजारो भाविकांना दरवर्षी होणार असल्याचे शेट्टर यांनी नमूद केले.