वृत्तनिवेदकाला प्रसंगावधान, सजगता, सचेत मन, शांत वृत्ती हे गरजेचे घटक असतात. न्यूज रूममध्ये आत शिरताच जगात काय काय घडलेलं आहे, काय काय चाललंय याची माहिती असावी लागते. पुढील कार्यक्रमांची मांडणी काय आहे याचा मागोवा हवा.
संध्याकाळचे चार वाजले असतील. मी आकाशवाणीच्या न्यूज रूममध्ये बातम्या करत बसलो होतो. इतक्यात एक मनुष्य तिथं पोहचला. अमूक अमूक जे फार मोठे भजन गायक होते ते निवर्तले ही बातमी द्या इतकंच तो सांगत होता. अधिकृत दुजोरा कसलाही नव्हता. आम्ही त्याला ओळखत नव्हतो. त्याच्याकडे सविस्तर कसलीही माहिती नव्हती. आम्ही ऐकून घेतलं. तो गेला. नंतर संध्याकाळी उशिरापर्यंत आम्ही त्या बातमीची इतर पत्रकार मित्रांकडून निश्चिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण दुजोरा मिळाला नाही. त्या काळी मोबाईल नव्हता. बातमी दिली नाही हे सांगणे नलगे.
आकाशवाणीच्या बातम्या या सरकारी आस्थापनाच्या बातम्या असल्याने त्यात विश्वासार्हता असते. स्रोतांकडून, सुत्रांकडून पक्की खात्री करून घेतल्याशिवाय बातमी देता येत नाही. खास करून मृत्यूच्या बातम्या जोखमीच्या असतात. मोठमोठ्या नेत्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांची प्रकृती गंभीर होती पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी बातमी मिडियाने दिली होती. क्लिनिकली डेड वा मेडिकली डेड अशा अनेक वैद्यकीय संकल्पना असतात, असो.
कोर्टाच्या निवाड्याच्या बातम्या देतानाही अशी फार काळजी घ्यावी लागते. त्या बातमीचा काटेकोर अनुवाद करावा लागतो. वाक्य वाक्य, शब्द शब्द तपासावं लागतं. राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री यांच्या बातम्यांविषयीही नितांत काळजी घ्यावी लागते.
सरकारात फूट पडण्याची शक्यता असेल व काही हालचाली सुरू झाल्या असतील, तर ती संभाव्य स्वरूपाची बातमी म्हणजे speculative news छापील मिडियाला चालते. सरकारी मिडियाला नव्हे. कारण असल्या बातम्यांत ठोस तथ्य नसते.
आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्यांचे स्रोत हे प्रतिनिधी, बातमीदार यांनी पाठवलेल्या वार्तांकनावर आधारित असतात. त्या काळी पीटीआय, युएनआय या वृत्तसंस्था होत्या. हे टेलिप्रिंटर वाजत असायचे. त्या कागदांचे टिकर काढून त्यातील लागू पडणाऱ्या शेती, विकास, सांस्कृतिक बातम्या आम्ही वेगळ्या निवडून ठेवत असू. नंतर ऐन त्या वेळी पाहिजे तितका मजकूर घेत.
वृत्तनिवेदकाला प्रसंगावधान, सजगता, सचेत मन, शांत वृत्ती हे गरजेचे घटक असतात. न्यूज रूममध्ये आत शिरताच जगात काय काय घडलेलं आहे, काय काय चाललंय याची माहिती असावी लागते. पुढील कार्यक्रमांची मांडणी काय आहे याचा मागोवा हवा. कारण त्याप्रमाणे आपल्या संध्याकाळच्या बातम्यांचा क्रम व हेडलायन्स ठरत असतात. वेळ कमीच असतो. एक गतिमानता असते. त्याला जुळवून घ्यावं लागतं.
सकाळची ड्युटी सहा वाजता सुरू व्हायची. राष्ट्रीय बुलेटीनची तयार प्रत दिल्लीहून फॅक्सने यायची. इंग्रजी. (आता ती ईमेलने येते). ती वेगाने कोंकणीत करावी लागे. ते बुलेटीन ८:४० ला असायचं. जे मुंबईलाही सहक्षेपित होतं. त्या अगोदर साडेआठला मराठी बातम्या दिल्लीहून सहक्षेपित होत. बातम्या लिहून थकल्याने, पहाटे आल्याने किंचित भूक लागायची. घसाही थोडा कोरडा झालेला असायचा. पण कॅंटीनमध्ये चहासाठी जायला तसा वेळ नसायचा. आठला हिंदी बातम्या असायच्या व नंतर इंग्रजी. या बातम्यांत कधी काय काय ब्रेक होईल याची शाश्वती नसे. शेवटी त्या बातम्या. घटना. पण निदान साडेआठच्या अगोदर स्टुडिओत जावून बसावं लागे. तिथं मराठी बातम्या सुरू व्हायच्या.
एका सकाळी एक स्मार्ट नैमित्तिक वृत्तनिवेदक ड्युटीवर होता. तो वर जाऊन मायक सज्ज करून बसला. तो प्रिंट मिडियातील असल्याने त्याला घटना खडानखडा माहीत असायच्या. याने बातमी लिहून नेली होती की ‘गुजरातचे मुख्यमंत्री अमूक अमूक हे अत्यंत आजारी असल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.’ मराठी बातम्या चालू असताना वृत्तनिवेदकाने शेवटच्या दोन मिनिटात बातमी वाचली. ‘आताच हातात आलेल्या बातमीनुसार गुजरातचे मुख्यमंत्री अमूक अमूक यांचे दु:खद निधन झाले.’ त्याबरोबर आमच्या कोंकणी वृत्तनिवेदकाने सावधानता बाळगून लागलीच ती पहिली हेडलायन केली आणि बातमीही व्यवस्थित वाचली. त्यांच्यावर अमूक हॉस्पिटलात उपचार चालू होते. अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे वगैरे वगैरे. या वृत्तनिवेदकाच्या या दक्ष कृतीविषयी त्याचं मी नंतर अभिनंदन केलं.
मुकेश थळी
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक,कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)