सुरंगीची फुले म्हणे खूप उंचावर असतात. त्यांचा वळेसर करायचा तर खूप उंच चढावं लागतं आणि न कुस्करता ती काढावी लागतात, सकाळी सकाळी. मावशी इतकी वर्षे खपून ती काढत आली होती, न कुस्करता, तसंच तिच्या आयुष्याचं.
‘मावशे, आबोली वळेसार कसो दिला गे?’ समोर आलेल्या गिऱ्हाईकाच्या आवाजाने शेवंता मावशी भानावर आली.
तशी शांतादुर्गेच्या देवळात कायमच गर्दी असायची. आज देवळात पंचमी असल्याने सकाळपासून भाविकांची जास्त गर्दी होती. सुट्टीचा मोसम असल्याने पर्यटकांचा राबताही होताच. सकाळपासून विकायला ठेवलेले हार, गजरे आता संपत आले होते.
सूर्य कलत आला. समोरच्या तळ्यातल्या सावल्या लांबलांब व्हायला लागल्या, तशी मावशी उठली. समोरचे फटकूर तिने झडाझड झाडून घेतले, खाली पडलेल्या कचऱ्यावर सान मारली आणि सामानसुमान गोळा करून देवळापुढचा उतार उतरू लागली. शेजारच्या खण नारळ विकणाऱ्या जाणत्याने तिला हटकले, “मावशे, आयज बेगीन वता गे?”
“हरी येवपाचो आसा रे.”
“मागीर बरे नुस्त्या हुमण आसाशे दिसता.”
“ना रे, बिरेस्तार न्हय रे आयज?”
“हय मगे. शिवराक खावपा लायतली दिसता चल्याक, इतल्या वरसानी येता तर?”
मावशी हसून वाटेला लागली. जाणता मात्र तिच्या वाटेकडे कितीतरी वेळ बघत राहिला. वाटेत मावशीची विचारचक्रे फिरत होती. हरी येणार, किती वर्षांनी येणार. “म्हजो पूत येतलो, म्हाका भांगरान न्हाणयतलो. मागीर हाव तेच्याखातीर एक बरी बायल सोदतले. इतली वर्सा कष्ट करून काडली, आता खय माका बरे दिस पळोवपा मेळटले.” ती वाड्यावर सगळ्यांना सांगायची.
यथावकाश हरीचं लग्न झालं. अन मावशीला बरी कसली, लाखात एक सून मिळाली होती. चंपा, चाफेकळी कशी. तिच्या येण्याने तो छोटासा वाडा घमघमून जायचा. फुले तिच्या आवडीची. त्यात सुरंगी तर बेहद आवडीची. चंपा सून म्हणून आली तेव्हा रिकाम्या लोकांनी सासूसुनेच्या नात्यांबद्दल मावशीचे खूप कान भरले होते. मात्र तिला पाय घरात ठेवलेला बघून, मावशीला आपल्याला नसलेली मुलगीच घरात आल्यासारखी वाटली होती. अन चंपा पण तिच्या विश्वासाला जागली. “म्हजे बाय चंपा, कितले गोड चली गे. सगळी कामां बरी करून करतले, बरे करून उलयतले. फुलांचेर ताजो जीव आसा.” मावशी सांगे.
आज मावशीने आपल्या फुलांतून दोन सुरंगी वळेसर बांधून तिच्यासाठी आणले होते. डोक्यात विचारचक्र घेऊन ती दिवसभराची कामं उरकायला लागली. परवा चवथ. माटोळी लावायची होती. एरव्ही तिच्या घरी चवथीदिवशी ती एकटीच असायची, एकटीच सगळं करायची. जवळचे सारे नातेवाईक दूर दूर पांगले होते. मग मावशी एकट्यानेच सगळं आवरे, शेजारच्या चंदूला माटवी बांधायला सांगे. आपल्या गणपतीबरोबर तो मावशीचाही गणपती आणून देई. शेजारची वत्सलकाकी नेवऱ्या करायच्या मदतीला येई. विसर्जनाच्या वेळी मात्र मावशीला आपल्या सगळ्या नात्यागोत्यांची हटकून आठवण येई, अन तिचे डोळे पाणावत. सखाराम गेल्यावर तिने बरेच कष्ट उपसून, फुलांचे हार, गजरे विकून संसार चालवला आणि हरीला मोठं केलं होतं.
तोच तिचा हरी उद्या येणार होता. सुरंगीची फुले म्हणे खूप उंचावर असतात. त्यांचा वळेसर करायचा तर खूप उंच चढावं लागतं, आणि न कुस्करता ती काढावी लागतात, सकाळी सकाळी. मावशी इतकी वर्षे खपून ती काढत आली होती, न कुस्करता, तसंच तिच्या आयुष्याचं. हरी आणि चंपा, आणि प्रथमेश, तिचा नातू पण येणार होता. सहज तिची नजर बाजूच्या कोपऱ्याकडे गेली. परवा इथे बाप्पा विराजमान होणार, अन तिचा छोटा बाप्पा, तिचा नातू प्रथमेश पण आजीआजी करून तिच्या अवतीभोवती वावरणार.
स्टूल लावून माळ्यावरची बाबूची खेळणी काढून घ्यायला हवी. सदा आल्यावर त्याला सांगायला हवं. सुरंगी ओट्यावर ठेवलीय. तशीच राहूदे म्हणजे झालं, बावूदे नको.
दार वाजल्याचा आवाज आला. वत्सलकाकी आली होती. “आयज म्हळे माश्शे पासय मारून येता तुमगेर. पोळवया तरी कीदे शिजता चुलीर?”
“तशी व्हड कीदे ना गे, हरी, सुनबाय आणि बाबू येतलो न्हय, तांजे खातीर सांन्ना करतले तवश्याची. बाबूक खूप आवडतत न्हय?”
“आगे अशे? मागीर हांव तुका मदत करता मगे. सामान हाडले न्हय?” असे म्हणून सवयीनेच वत्सलकाकी स्वयंपाक घरातल्या कोनाड्याकडे वळली. सामानसुमान घेतले आणि नेवऱ्यांची तयारी करू लागली. “आज आमगेर पावणे आयला गे एक, ते पूण येतले तुका मदत करपा म्हजे वांगडा.”
“बरे जालें गे बाय. आमच्या चंपाक कोणतरी उलोवपा मेळळे.”
“हं” असा निश्वास सोडत वत्सलकाकी कामाला लागली. एव्हाना देवळातला सायंचौघडा वाजला असेल. दिवेलागण व्हायला आली आहे.
ओट्यावरच्या सुरंगीचा घमघमाट नाकात भरून राहिला आहे. सुरंगीवर कुणा जनावराची नजर पडायला नको.
दार परत एकदा वाजले. पाव्हणी दाराशी आली. तिच्या चाहुलीने वत्सल काकी उठून उभी राहिली. “हे आमगेले शामल गे मावशे, म्हज्या भयणिले चली. स्कुला शिकयता पणजे.”
“अशें? खंयचे इस्कॉल गो?”
“शारदा मंदिर”
“आगे म्हज्या बाबूक शिकयता मगे तू.”
“आगे ना गे, ते खयचे दुसरे इस्कॉल असतले. मळ्या रावता मगे तुजो पूत?” वत्सलकाकी जरा बावचळली.
मावशीच्या डोळ्यात आता माया भरली होती. “आगे ना गे, शारदा मंदिरान शिकता बाबू. तू शिकयता असतले. आमच्या बाबूले टीचर.”
काकीने आवंढा गिळलेला शामलने टिपला. काकी अस्वस्थ झाली होती.
सुरंगीचा वळेसर छान गुंफला आहे, तो तसाच दरवळत राहूदे.
मावशी आता एका नव्या उत्साहाने बोलू लागली. “पळय गे टीचर, आमगेलो बाबू सवेन आसा. मातसो मोटवो, आनी दिसपा सामको गुटगुटीत क्रीश्न कसो. ताजो आवाज गोड आसा, सामको ताज्या आज्या भशेन. ताका म्हाका गायनाच्या क्लासिक घालपा जाय. पूण मातसो गणित बी शिकपा हळू आसा. ताजेकडे लक्ष दि हा टीचर. फुडाराक वसून व्हड मनीस करपाचो आसा, बाबू हुशार आसा गे, पण खूप मस्ती आसा. आवय बापायक पूण केंना केंना आयकना."
म्हातारीचे डोळे दरवाज्याकडे लागले होते. हनुवटीवर मूठ ठेवून ती आता बोलण्यात रंगून गेली. “बाबूक व्हडलो हापीसर करतले हांव. खूप खूप शिकून तो मुंबई वसून व्हडलो बंगलो बांदतलो. व्हडली गाडी घेवन फिरतलो. केन्नातरी घरा येतलो, आवय बापायक घेवन.” म्हातारीच्या प्रत्येक शब्दानिशी काकीची चुळबुळ वाढली. शेवटी ती घरी जायचे कारण शोधू लागली.
पाव्हणीला काकीची अस्वस्थता कळेना. पण आपल्याही मनाची अशी घालमेल का होतेय हेही कळेना. इकडे म्हातारी बोलतच होती. “मागीर म्हजो बाबू घरा येतलो, तेन्ना ही घराफुडली शेवती, आबोली कितली फुलोन व्हावतली. दाराफुडली केळी, माड खूप बरे लागतले. मोती कुत्रो बाबूक वळकपा ना, पूण एकदा वळक जाली की भूकत, शेपडी हालायत रावतलो खोशियेन.”
काकीने आता शामलचा हात धरला, अन ती घाई गडबडीने उठली, “आगे मावशे, दुद दवरला गे गॅसार. वतून बी वचत, म्हाका वसपा जाय.”
शामल गोंधळात पडली, कुजबुजत म्हणाली, “आगे पूण दुद तर हाव बंद करून आयला.”
म्हातारीची बडबड चालूच होती, “आगो आयकून जा तर. मागीर आमचो बाबू घराच्या दारार लायलली पाटी पळयतलो, ताज्या आज्जेच्या मोगाळ फुलांबशेन नाजूक नाव बरयलेली.”
“डॉ. प्रथमेश हरी सावंत”
अन आठवणींचा पडदा सर्रकन वीज लख्ख पडून उजळावा, तसं ते नाव, अन तो चेहरा शामलच्या डोळ्यासमोर चमकून गेले.
तो पांढरा शर्ट, ते निळे डोळे.
काहीतरी ओळखीचं वाटलं होतं तिला तेव्हाच.
झटकन उठून ती काकीबरोबर दरवाजाबाहेर आली, ती थरथरणाऱ्या हातांनी.
“सुरंगीच्या वळेसाराक केंनाचीच नजर लागला गो, शामल.” “काकूट दिसता म्हातारीची. हरी येवपा ना गे. सून आणि बाबू पूण ना. केन्नाच ना.” वत्सलकाकीच्या डोळ्यात खळकन पाणी आलं.
पाव्हणीच्या हातातली पातेली खाली पडली. तिच्या डोळ्यांसमोर तो आठवणींचा पट उभा राहिला, तो सहावीचा वर्ग... अन ती दोन मिनिटे पाळलेली शांतता. “चार वर्सा जाली. त्या चवथेक हरी, ताजी बायल आणि पूत येताले गाडी करून. वाटेन गाडीक एका ट्रकान उडयले मगे, आन...” वत्सलकाकीला हुंदका कोंडेना.
ओट्यावरची सुरंगीची वेणी विखरून तिची पिवळट लहान फुले इतस्तत: पडली होती.