३.५० लाखांपैकी २ लाख रुपये रोकड हस्तगत
म्हापसा : येथील टॅक्सी स्टॅण्डजवळील काजूगर दुकानातून ३.५० लाख रुपये रक्कम चोरी प्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील २ लाख रुपये रक्कम जप्त केली.
कालू राम (१९, रा. काणका व मूळ राजस्थान), जुहारा राम (२४, राजस्थान) व नारायणलाल चौधरी (३५, राजस्थान) अशी संशयितांची नावे असून कालू राम हा काजूगर या दुकानात कामाला होता. संशयित कालू रामला म्हापसा पोलिसांनी तर जुहारा राम व नारामणलाल या दोघांना राजस्थान पोलिसांच्या सहाय्याने पकडून अटक केली.
चोरीची घटना दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी दुकान मालक सुरेंद्रसिंग पुरोहित यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दि. ३० व ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही चोरी घडली होती. संशयितांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला व दुकानात फिर्यादींनी ठेवलेली ३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम पळवून नेली होती.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी या संशयितांचा माग काढला होता. चोरीच्या घटनेच्या दिवसापासून संशयित कालू राम हा फरार होता. संशयित जुहारा राम व नारायणलाल चौधरी हे दोघे संशयिताचे मित्र होते. अधूनमधून त्यांची गोव्यात ये- जा असायची. गोव्यात आल्यावर ते कालू रामला भेटण्यासाठी येत असत.
पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉ. आनंद राठोड, अनिल राठोड, प्रथमेश मोटे, अक्षय पाटील व प्रकाश पोळेकर या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जुहारा राम राजस्थानमधील सराईत गुन्हेगार
संशयित आरोपी जुहारा राम हा राजस्थानमधील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. तसेच दरोडा, खुनी हल्ला, शस्त्रास्त्र कायद्याखाली संशयिताविरुद्ध गुन्हे राजस्थानमध्ये नोंदवण्यात आले आहेत.