सोशल मीडियावर दिसत असलेली नाराजी मतदान यंत्रांमधून परावर्तित होईल की हरयाणाप्रमाणेच महाराष्ट्रातील मतदार कौल देतील, तेही २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. सध्या तरी महाराष्ट्रात प्रचाराच्या रणधुमाळीत बॅगा तपासण्यावरून वातावरण तापलेले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या आश्वासनांनंतर आता नेत्यांच्या बॅगा तपासण्याचा मुद्दा प्रचारात गाजत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या बॅगा तपासणीचे राजकीय भांडवल होत आहे. राजकीय नेते आपल्यासोबत बॅगा भरून पैसे वाहून नेत आहेत, असे वाटणे हेच मुळात हास्यास्पद आहे. महाराष्ट्रात त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासह एकमेकाला टोमणे मारण्याचे राजकारणही सुरू झाले आहे. याच आठवड्यात हा बॅगा तपासण्याचा प्रकार सुरू झाला. सोमवार, मंगळवारनंतर गुरुवारीही उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या त्यामुळे ते हैराण झाले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचीही ऑन रिकॉर्ड झाडाझडती घेतली. सोमवारच्या तपासणीनंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीवर टीका केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही बागा तपासल्या. गोव्याचे मुख्यमंत्री कराडमधील विमानतळावर दाखल झाले, तिथे त्यांच्याही बॅगा तपासण्यात आल्या. आधी दोन्ही गटांच्या जाहीरनाम्यांवरून एकमेकांना लक्ष करणारे नेते, सध्या बॅगांच्या तपासणीवरून एकमेकांवर टीका करत आहेत. निवडणूक आयोग जी वेगवेगळी पथके स्थापन करते त्यात विमान, हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या नेत्यांच्या बॅगा तापसणीचे कामही दिलेले असते. ही पथके फक्त नेतेच नव्हेत तर आवश्यकता भासते तिथे इतरांच्याही बॅगा निवडणुकीच्या काळात तपासू शकतात. अद्याप महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे घबाड निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले नसले तरी निवडणुकीत पैशांचे मोठे व्यवहार होऊ शकतात, हे सर्वांनाच माहीत आहे. सर्वत्र पैशांचा वापर होत असला तरी निवडणूक आयोगाच्या पथकांच्या नजरा चुकवून हे व्यवहार होत असतात. महाराष्ट्रातील निवडणुकीवर नजर ठेवण्यासाठी सुमारे सहा हजार पथके स्थापन केली आहेत. त्या पथकांनी सध्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याचे सत्रच सुरू केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वारंवार बॅगा तपासल्या जात असल्यामुळे हे राजकीय हेतूनेच होत असल्याचा आरोप ते करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरे यांची खिल्ली उडवत आमच्या पण बॅगा तपासल्या जातात, त्याचा बाऊ करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत बॅगा तापसणीचे समर्थनच केले आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी बॅगा तपासतात त्यावरून नेत्यांना राग यायला हवा, पण सत्ताधारी गटातील नेत्यांना राग आल्याचे दिसत नाही. विरोधकांनी मात्र या एकूणच प्रकारावरून संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या मतदानाला पाच दिवस शिल्लक आहेत. पुढील दोन दिवसांत प्रचारही संपणार आहे. प्रचारासाठी सध्या महाराष्ट्रात हेलिकॉप्टर आणि खासगी विमानांच्या फेऱ्या सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असली तरी या लढतीत आमने सामने दोन पक्ष नाहीत, तर दोन्ही गटांमध्ये दोन तीन मोठ्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. मागच्या निवडणुकीत एकमेकांसोबत असलेले नेते या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आहेत. एकमेकांच्या विचारधारांना बाजूला सारून नेते एकत्र आले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील मतदारही गोंधळलेले आहेत. कुठल्याच विचारधारेवर आणि कोणाच्याच धोरणांवर विश्वास ठेवू नये, असे धडे मतदारांना मिळाले आहेत. त्यामुळे घाबरून गेलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना मोफतच्या सुविधा देण्याची आमिषे दाखवून महाराष्ट्राला आर्थिक खाईत ढकलण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी नेते बरेच उतावीळ झाले आहेत.
२० रोजी मतदानावेळी ९.६३ कोटी मतदार महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. सोशल मीडियावर दिसत असलेली नाराजी मतदान यंत्रांमधून परावर्तित होईल की हरयाणाप्रमाणेच महाराष्ट्रातील मतदार कौल देतील, तेही २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. सध्या तरी महाराष्ट्रात प्रचाराच्या रणधुमाळीत बॅगा तपासण्यावरून वातावरण तापलेले आहे. या तापलेल्या वातावरणाचाही फायदा उठवण्यासाठी दोन्ही गटांतील नेते प्रयत्न करत आहेत. या बॅगा तपासण्यातून आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या हाती काहीच लागलेले नाही, तरीही आडवाटेने सर्वत्र बॅगा गेल्या नसतील आणि निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार नाही, असे म्हणणेही चुकीचेच ठरेल.