रेडिओ अमर आहे

मार्क टुलींची सर्व पुस्तके मी वाचली होती. रेडिओची भाषा सुटसुटीत असावी हे त्याच्या वाक्यागणिक जाणवायचं. एक वाक्य कायम लक्षात कोरलं गेलं की, कितीही माध्यमं आली तरी, रेडिओ कधीही मरणार नाही.

Story: ये आकाशवाणी है |
10th November, 03:56 am
रेडिओ अमर आहे

आकाशवाणी हा सरकारी रेडिओ असल्याने सरकारची ध्येयधोरणे कायम प्रसारित व्हावी हे साहजिक. तसंच सरकारविरोधी टीकेचा एक शब्दही इथं चालत नाही. निवडणुका जवळ येत असतात त्यावेळी आकाशवाणी कमालीची सतर्क व सक्रिय असते. देशभर मतदानाचे महत्त्व सांगणारे विविध कार्यक्रम आयोजिले जातात. त्यात निवडणूक अधिकाऱ्यांच्या लाइव्ह वा ध्वनीमुद्रित मुलाखती, भाषणे यांचा समावेश असतो. जास्तीतजास्त मतदान व्हावे हा उद्देश असतो. जागृती करायला हे कार्यक्रम म्हणजे बफर स्रोत असतात. निवडणूक अधिकाऱ्यांच्या लायव्ह मुलाखती व फोन-इन कार्यक्रम आम्ही अनेक केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या वेळी हे कार्यक्रम होतात.

असाच एक लाइव्ह फोन इन कार्यक्रम होता. दोन सरकारी अधिकारी होते. मी संवादक. सरकारी अधिकारी असल्यावर तितका ताण संवादकावर असत नाही. कारण त्या अधिकाऱ्यांना काय बोलू नये हे माहीत असतं. इतरांना ते ट्रॅकबाहेर जातानाच सोज्वळ हस्तक्षेप करून रूळावर आणावं लागतं. 

लायव्ह कार्यक्रम वेळेवरच सुरू होतो. दुपारची साडेतीनची वेळ. कंट्रोल रूममध्ये दोन इंजिनियर व संपादक होते. एक अधिकारी प्रक्षेपणाला दोन मिनिटं बाकी होती तरी आलाच नाही. संपादक जरा बेचैन झाले. मी त्यांना थंडपणे समजावलं, दुसरा इथे आहे ना, त्याची मुलाखत मी घेतो. शेवटी शो मस्ट गो ऑन. कार्यक्रम सुरू झाला. मी सुरुवातीचं निवेदन करत होतो. इतक्यात तो अधिकारी घामाघूम होत स्टुडियोचं भारी जड दार ढकलून आत आला. त्याला मी खुणेने बस म्हणून सांगितलं. मीही शांत, थंड बसलो. दुसऱ्याच्या चुकीमुळे मी क्रोधित झालो, तर निवेदनावर परिणाम होणार. कार्यक्रम झाला. पण त्यानं सर्व टीमला टेन्शन दिलं होतं. तो आपल्या बेशिस्तीच्या कालेतीला (स्वभावाला) प्रामाणिक होता इतकंच. 

असे अनेक अनुभव घेतले. त्यातून आपली सहनशीलता कसाला लागते. आतून प्रगल्भता येते. समजा काही कारणास्तव दोघेही पोचले नसते तरीही डोकं थंड ठेवून निवडणूक प्रक्रियेतील मतदारांची कर्तव्ये, आचार संहिता, राजकीय पक्षांची कर्तव्ये, त्यांच्या खर्चाच्या, प्रचाराच्या मर्यादा असे अनेक मुद्दे, कागदं संवादकाच्या हातात पाहिजेत. संवादक इथं वृत्तसंपादकांची मुलाखत घेऊ शकतो. 

फोन इन कार्यक्रमात एकदा माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. अर्थात तो प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना होता. पण त्यानं कोंकणी आवाजाचा हेल मुद्दामहून असा काही लावला की मला का कुणास ठाऊक, हसू येत होतं. ही गोष्ट तो मला हसवायला मुद्दाम करत होता. गंमत म्हणून. मी स्वत:ला सावरलं. उत्तर दिलं गेलं. नंतर प्रोग्राम झाल्यावर खाली आलो, मित्राला फोन करून असं करू नकोस रे राजा, असं सुनावलं. त्याचा स्वभाव खेळकर विनोदी. बैठकीत वगैरे मला तो डोळ्यांच्या खुणेने हसवतो.  

निवडणूक जवळ आली रे आली, वृत्त विभाग हॉट वायर सारखा धामधूमीत असतो. दिल्लीच्या मुख्य समाचार विभागात सर्व उमेदवारांची माहिती, मतदारांची संख्या व इतर कोष्टकं पाठवावी लागतात. तयारी कशी चाललीय त्यावर व्हॉइस ओव्हर द्यावे लागतात. हिंदी आणि इंग्रजी भाषेत, या भाषांच्या राष्ट्रीय बुलेटिनसाठी. हिंदीचा सराव वाढवावा लागतो. अपक्ष उमेदवारासाठी निर्दलीय उम्मीदवार हा शब्द वापरतात. सर गर्मियां तेज हो रही हैं, प्रचार की गती जोर पकड रही है... असली वाक्यं तोंडात घोळवावी लागतात. इंग्रजीचा सराव आहे. मराठी सहज बोलता येते.

शासकीय कामकाजाची खडानखडा जाण या वार्तांकनामुळे, मुलाखतींमुळे एक पक्वता लेवून आली. निवडणूक प्रक्रियेची एक भाषा असते. शब्द असतात. इडियम असते. ती तोंडी मुरली पाहिजे, लोणच्यासारखी. एक विलक्षण आत्मविश्वास येतो.

मार्क टुली हा बीबीसीचा भारतातील प्रतिनिधी होता. काही दशके तो गाजला. त्याची पुस्तके आहेत. त्यातील भाषा पाहिली तर वाटते, आम्ही ब्रिटनात जन्मलो व मार्क उत्तर प्रदेशात. इतकी सोपी. संपर्क भाषा कशी असावी याचा हा नमुना. मार्क टुलींची सर्व पुस्तके मी वाचली होती. रेडिओची भाषा सुटसुटीत असावी हे त्याच्या वाक्यागणिक जाणवायचं. एक वाक्य कायम लक्षात कोरलं गेलं की, कितीही माध्यमं आली तरी, रेडिओ कधीही मरणार नाही.


- मुकेश थळी 
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)