क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त, कठीण काळात नोकरदारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सॅलरी ओव्हरड्राफ्टचा पर्याय देखील आहे. या पर्यायाचा फायदा कसा घ्यावा ते जाणून घेऊया.
मुंबई : आर्थिक संकटाच्या काळात, बहुतेक नोकरदार लोक क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज किंवा मित्रांकडून कर्ज घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करतात. परंतु या व्यतिरिक्त, पगार खात्यात असलेली ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील एक उत्तम पर्याय आहे. याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या गरजा भागवू शकता. कसे ? वाचा सविस्तर
सॅलरी ओव्हरड्राफ्ट ही एक प्रकारची कर्ज सुविधा आहे. ही तुमच्या सॅलरी अकाऊंटशी जोडलेली असते. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात शिल्लक नसतानाही अतिरिक्त रक्कम काढू शकता. सहसा ही रक्कम तुमच्या पगाराच्या दोन ते तीन पट असू शकते. जेव्हा अचानक पैशाची गरज भासते आणि इतर कोणतेही साधन उपलब्ध नसते तेव्हा हा पर्याय तुमच्या कामी येतो.
सॅलरी ओव्हरड्राफ्टसाठी प्रत्येक बँकेने स्वतःचे नियम बनवले आहेत. काही बँका तुमच्या पगाराच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट देतात, तर काही तुमच्या पगाराच्या २-३ पट पर्यंत देतात. तुमच्या मागील रेकॉर्ड आणि खात्याच्या स्थितीच्या आधारावर बँका त्याचे प्रमाण ठरवतात. विशेष म्हणजे तुम्ही वापरलेल्या रकमेवरच तुम्हाला व्याज भरावे लागते. हे व्याजदर क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जापेक्षा कमीच असते.
सॅलरी ओव्हरड्राफ्टचे फायदे काय ?
१) प्रक्रिया शुल्काचा त्रास नाही: वैयक्तिक कर्जाप्रमाणे सॅलरी ओव्हरड्राफ्टवर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.
२) फक्त काढलेल्या रकमेवर व्याज: बँकेने मंजूर केलेल्या संपूर्ण रकमेवर व्याज आकारले जात नाही, तर तुम्ही खात्यातून काढलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते. हे वैयक्तिक कर्जाच्या एकदम विपरीत आहे. पर्सनल लोनच्या संपूर्ण मंजूर रकमेवर व्याज आकारले जाते. यामुळे सॅलरी ओव्हरड्राफ्ट सुविधा किफायतशीर आहे.
३) प्रीपेमेंट शुल्कापासून सुटका: जर तुम्ही कर्जाची रक्कम निर्धारित वेळेपूर्वी परतफेड केली, तर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क भरावे लागणार नाही, तर वैयक्तिक कर्जामध्ये असे शुल्क आकारले जाते.
४) वापराच्या कालावधीनुसार व्याज: ज्या कालावधीसाठी ओव्हरड्राफ्ट रक्कम तुमच्याकडे राहते फक्त त्याच कालावधीसाठी व्याज भरावे लागेल.
५) परवडणारा पर्याय: सॅलरी ओव्हरड्राफ्ट हा नोकरदार वर्गातील लोकांसाठी एक व्यावहारिक आणि परवडणारा पर्याय आहे. अचानक पैशांची निकड भासल्यास त्वरित आराम देऊ शकतो.