नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो आणि आता ८वा वेतन आयोग स्थापन होण्याची वेळ जवळ आली आहे. माहितीनुसार, सरकार २०२५ च्या बजेटमध्ये ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते. ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर त्यांना ५२ टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे.
८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान आणि कमाल वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. किमान वेतन १८ हजार रुपयांवरून ३४ हजार ५६० रुपयांपर्यंत वाढू शकते. म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात अंदाजे ५२ टक्क्यांची वाढ होईल. दरम्यान, ८व्या वेतन आयोगावर चर्चा करण्यासाठी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये संयुक्त सल्लागार मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचा विचार करून कामगार संघटना आपल्या मागण्या मांडणार आहेत.
८व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा फायदा पेन्शनधारकांनाही होणार आहे. नवीन वेतन रचनेनुसार, सध्याची किमान पेन्शन ९ हजार रुपयांवरून ते १७ हजार २८० रुपयांपर्यंत वाढू शकते. याशिवाय, फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या ७व्या वेतन आयोगांतर्गत २.५७ पट फिटमेंट फॅक्टर नुसार पगार दिला जात आहे. आता आठव्या वेतन आयोग अंतर्गत मात्र हा फिटमेंट फॅक्टर आणखी वाढणार आहे. आठवा वेतन आयोग जेव्हा लागू होईल तेव्हा हा फिटमेंट फॅक्टर ३.६८ एवढा होणार आहे. यामुळे भत्त्यांसह कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी १५ ते २० टक्क्यांची वाढ देखील होऊ शकते. .