वाळपई - सत्तरीतील एकास १.०३ कोटींचा गंडा

सायबर विभागाकडून बंगळुरूतून संशयितास अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th November, 12:16 am
वाळपई - सत्तरीतील एकास १.०३ कोटींचा गंडा

पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून वाळपई - सत्तरी येथील एकाला १.०३ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने कुमार उत्लासर (५०, बंगळुरू - कर्नाटक) या संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या बँक खात्याची तपासणी केली असता, त्याच्या खात्यात इतर ९ राज्यांतील व्यक्तींकडून सुमारे २.३ कोटी रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वाळपई -सत्तरी येथील एका व्यक्तीने २२ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ३ ऑक्टोबर पूर्वी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम व सोशल मीडियाच्या इतर माध्यमांद्वारे संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदाराला ‘ए-३३ हाय क्लॉलिटी स्टॉक एक्सचेंज ग्रुप’ या सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये सहभाग करून घेतले. त्यानंतर त्याला SMIFSMAX अॅप डाऊनलोड करण्यात लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकेच्या खात्यात सुमारे १ कोटी ३ लाख २८ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. काही काळानंतर संबंधित अॅपमधील तक्रारदाराचे खाते ब्लाॅक करण्यात आले. याच दरम्यान फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेत सुमारे १ कोटी ३ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भा. न्या. सं. कलम ३१८(४), ३१९ (२) ३१९(२) आरडब्ल्यू ३(५)आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याच दरम्यान बंगळुरू- कर्नाटक येथील ऑरिंको डायनस्टेन या आस्थापनांच्या खात्यात तक्रारदाराने रक्कम जमा केल्याचे समोर आले. तसेच त्या बँक खात्यातून ६ लाख रुपये काढल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, काॅ. अक्षय नाईक आणि सुमय भगत या पथकाला वरील ठिकाणी पाठविण्यात आले. पथकाने कुमार उत्लासर या बँकधारकाचा शोध लावला. त्याची चौकशी करून त्याला गोव्यात आणून अटक केली.

कुमारकडून नऊ राज्यांमध्ये फसवणूक

सायबर विभागाने कुमार उत्लासर याच्या बँक खात्याची चौकशी केली असता, नऊ वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याने फसवणूक केल्याचे दिसून आले. त्या खात्यातून एकूण २ कोटी ३० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. 

हेही वाचा