एफसी गोवाचा सलग दुसरा विजय

इंडियन सुपर लीग : होमग्राऊंडवर पंजाब एफसीवर २-१ अशी मात

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
06th November, 11:58 pm
एफसी गोवाचा सलग दुसरा विजय

पणजी : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२४-२५ हंगामातील साखळी सामन्यात होमग्राउंडवर बुधवारी एफसी गोवाने पंजाब एफसीवर २-१ अशी मात केली. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे.
पाच दिवसांत दुसरा सामना खेळणाऱ्या एफसी गोवाने कमालीचे सातत्य राखले. बंगळूरू एफसीची अपराजित मालिका खंडित केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. त्याचा प्रत्यय आला. एकेर गॅरोटक्सेना त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एक गोल करताना एक गोल कऱण्यात मदत केली. अर्मांडो सडिकूने फॉर्म राखताना एक गोल करत विजयाला हातभार लावला.
यजमानांनी सलग दुसरा विजय मिळवला तरी पाहुण्या संघाने सुरूवातीला आघाडी घेतली होती. अस्मिर सुजीकने १३व्या मिनिटाला निहाल सुदीशच्या क्रॉसवर पंजाब एफसीचे लवकर खाते उघडले. मात्र, त्यांची आघाडी जेमतेम ९ मिनिटे टिकली. २२व्या मिनिटाला फॉर्मात असलेल्या अर्मांडो सडिकूने यजमानांना १-१ अशी बरोबरी गाठून दिली. एकेर गॅरोटक्सेनाच्या पासवर त्याने प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी भेदली. त्यानंतर दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यात अपयश आले. त्यामुळे मध्यंतराला १-१ अशी बरोबरी राहिली.
उत्तरार्धात एफसी गोवाने अधिक वेगवान आणि प्रभावी खेळ केला. त्याचे फलस्वरूप मध्यंतरानंतर ४ मिनिटांनी यजमानांनी आघाडी घेतली. त्याचे श्रेय गॅरोटक्सेनाला जाते. त्याने सहा यार्डवरून डाव्या पायाने चेंडूला अचूक गोलपोस्टमध्ये पाठवले. हा गोल महत्वपूर्ण ठरला. त्यानंतर उर्वरित ४१ मिनिटे तसेच इन्ज्यूरी टाईममध्ये एफसी गोवाने आघाडी वाढवण्यासाठी तसेच पंजाब एफसीने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, दोन्ही टीमच्या बचावफळीने प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला.
सलग दुसऱ्या विजयासह एफसी गोवाने ८ सामन्यातून ३ विजयासह १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. पंजाबचा ६ सामन्यातील हा दुसरा पराभव आहे.
निकाल
एफसी गोवा २ (अर्मांडो सडिकू २२ व्या मिनिटाला, एकेर गॅरोटक्सेना ४९ मिनिटाला)
विजयी वि. पंजाब एफसी १ (अस्मिर सुजीक १३व्या मिनिटाला)