नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव : अनेक संघ नवीन कर्णधाराच्या शोधात
बंगळुरू : आयपीएल २०२५च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेंशन याद्या जाहीर केल्या असून आयपीएल लिलावाची तारीख आणि ठिकाण याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मेगा लिलाव रियाधमध्ये होणार आहे. बीसीसीआयने लिलावाचे ठिकाण म्हणून रियाधला अंतिम मान्यता दिल्याचे वृत्त आहे.
सदर मेगा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या देशात सण आणि लग्नाचा हंगाम आहे, त्यामुळे अलिशान हॉटेल्स उपलब्ध नाहीत. परिणामी बीसीसीआयने आयपीएल खेळाडूंचा लिलाव इतर देशात करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव
बीसीसीआय सौदी अरेबियातील रियाध आणि जेद्दाह या दोन शहरांमध्ये पर्याय शोधत आहे. बोर्डाने यासाठी सौदी अरेबियालाही टीम पाठवली होती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही शहरांना भेट दिली. त्यानंतर रियाधला अंतिम मान्यता देण्यात आली आहे असून मेगा लिलावाचे आयोजन २४ किंवा २५ नोव्हेंबर रोजी केले जाण्याची शक्यता आहे.
लिलावात दिग्गज खेळाडूंचा समावेश
दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपरजायंट्स, कोलकाता नाईट रायडर्ससह अनेक संघ आता नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आयपीएलच्या मेगा लिलावाकडे लागल्या आहेत. या लिलावात सर्व फ्रँचायझी नवीन संघ तयार करणार आहेत. अलीकडे, सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेंशन याद्या जाहीर केल्या. ज्यामध्ये त्यांनी अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले. सर्व फ्रँचायझींनी काही खेळाडूंना कायम ठेवले आणि तर अनेक दिग्गजांना रिलीज केले.
जुरेल, रिंकू, पाथिरानाच्या किमतीत वाढ
रिटेंशनदरम्यान ध्रुव जुरेल, रिंकू सिंह, मथिशा पाथिराना यांच्यासह काही खेळाडूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. जुरेलला २० लाखांवरून १४ कोटी, रिंकूला ५५ लाखांवरून १३ कोटी, पाथीरानाला २० लाखांवरून १३ कोटी, मयंक यादव आणि रजत पाटीदारला २० लाखांवरून ११ कोटी रुपये मिळाले आहेत.
पंत, अय्यर, राहुल दिसणार लिलावात
या मेगा लिलावात अनेक स्टार खेळाडू बक्कळ कमाई करतील. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मिचेल स्टार्क, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, इशान किशन यांच्यासह जोस बटलर, एडन मार्कराम, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस या परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. कारण या बड्या खेळाडूंना त्यांच्या आधीच्या संघांनी रिलीज केले आहे. त्यामुळे हे सर्व खेळाडू पुन्हा एकदा लिलावात दिसतील. त्यांना आता कोणते संघ खरेदी करतात याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.