सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट स्पर्धा : म्हापसा ड्रीम क्रशर्स, सिंक रेंजर्सचा पराभव
मडगाव : ७व्या सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांत अल्ट्राकॉन मडगाव रॉयल्सने म्हापसा ड्रीम क्रशर्सचा ३ गडी राखून पराभव केला. दिवसातील दुसर्या सामन्यात डेझर्टस् अँड मोर अव्हेंजर्सने व्हीजेडी पद्धतीने सिंक रेंजर्सचा १२ धावांनी पराभव केला. आर्लेम क्रिकेट मैदानावर हे दोन्ही सामने खेळविण्यात आले.
पहिल्या सामन्यात रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथन गोलंदाजी केली. थोड्याशा ओलसर खेळपट्टीचा लाभ उठवण्याचा त्यांना इरादा होता. परंतु, प्रत्येकी १७ षटकांच्या झालेल्या या सामन्यात दुर्गेश प्रभुगावकरने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानांचा पुरेपूर लाभ उठवत १५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. त्याने आपला सहकारी पंकज नाईक (१०) याच्यासह २७ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी केली. तिसर्या क्रमांकावर आलेल्या १४ वर्षीय अदीप प्रभू मिस्किनने रॉयल्सच्या गोलंदाजांना स्वस्थ बसू दिले नाही. त्याने ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४० धावा केल्या. त्याला पार्थ कोसंबेची चांगली साथ मिळाली. पार्थने १६ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह २१ धावा केल्या. अनीश म्हांबरे १४ धावांवर व महेश चुरी ११ धावांवर नाबाद राहिला. ड्रीम क्रशर्सने निर्धारित १७ षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या. रॉयल्सकडून सिद्धेश देसाई, शौनित सावर्डेकर व संदेश बांबोळकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्सची सुरुवात खराब झाली. महेंद्र अवदीला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार दामोदर पै पाटणेकरने २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांनिशी नाबाद ३९ धावा केल्या. साईल कोसंबे (३२ धावा, २७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार)ने ३५ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. मधल्या फळीत निकित नाईक दलालला खाते उघडता आले नाही. मेघ नेत्रावळकरने १८ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २९ धावा केल्या. प्रशील कामतने ११ धावांचे योगदान दिले. सिद्धेश देसाईने १९ धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेले. ४ चेंडूंत ६ धावांची आवश्यकता असताना संघमालक आशेष पै दुकळेने नाबाद ७ धावा करताना एक चेंडू शिल्लक राखत संघाला विजयी वेस ओलांडून दिली. ड्रीम क्रशर्सकडून सर्वेश कामत, क्रितिन भांगी, महेश चुरी व केशव भट यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
पहिल्या सामन्यातील वैयक्तिक बक्षिसे
दामोदर पै पाटणेकर : ड्रोगारिया कोलवाळकर पुरस्कृत सामनावीर पुरस्कार, प्रायॉरिटी कन्स्ट्रक्शन्स सर्वोत्तम फलंदाज : अदीप परेश मिस्किन, सर्वोत्तम गोलंदाज : शौनित सावर्डेकर.
डीएनएम अव्हेंजर्सची सिंक रेंजर्सवर १२ धावांनी मात
दुसर्या सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या सिंक रेंजर्सला डीएनएम अव्हेंजर्सचा युवा गोलंदाज संकल्प भट याच्यासमोर निभाव लागला नाही. त्याने दोन षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये नीलय नाईक दलाल (१३), सचिन केंकरे (०) व साईराज धोंड (१४) यांचे बळी मिळवले. त्याने १२ धावांत ३ गडी बाद केले. यानंतर कर्णधार साहील अडवलपालकर (३३ धावा, ३६ चेंडू, ३ चौकार)ने युवा स्मित दळवी (२८ धावा, २९ चेंडू, १ चौकार) याच्यासह ५८ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी करताना १४ षटकांत संघाला ४ बाद ९० अशी स्थिती गाठून दिली.
सनथ म्हापणे केवळ ५ धावा करून बाद झाल्यानंतर गौरव गायतोंडेने १२ चेंडूंचा सामना करताना १ चौकार व १ षटकारासह १६ धावा केल्या. युवा संप्रभ फळदेसाईने १३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २६ धावा झोडपल्या. यामुळे सिंक रेंजर्सला २० षटकांत ७ बाद १४३ अशी धावसंख्या उभारता आली. अव्हेंजर्सकडून संकल्प भटने १२ धावांत ३, वैभव कडकडेने १८ धावांत २, सिद्धेश प्रभू अळवेणकरने २३ धावांत १ व आदित्य दलालने ३४ धावांत १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अव्हेंजर्सने सचिन भांडारे (११) व सनत प्रभुदेसाई (१) यांना लवकर गमावले. आदित्य दलाल व सरिन पै काणे यांनी संघाचा कोसळता डोलारा सावरला. आदित्यने ११ चेंडूंत ३ चौकारांसह २० व सरिनने ३१ चेंडूंत ३ चौकारांसह ३६ धावा केल्या. ही भागीदारी फुटल्यानंतर अव्हेंजर्सने अजून काही विकेट्स गमावल्या. परंतु, वैभव कडकडे (१३), अखिल नाडकर्णी (१९), सिद्धेश प्रभू अळवेणकर (नाबाद १४) यांनी अंधुक प्रकाश होत असतानाही मोलाचे योगदान दिले. पंचांनी प्रकाशामुळे खेळ थांबविला त्यावेळेस अव्हेंजर्सने ६ बाद १३२ धावा केल्या होत्या. त्यांना व्हीजेडी पद्धतीचा वापर करत १२ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. १७ षटकांनंतर त्यांना व्हीजेडीनुसार १२० धावा आवश्यक होत्या. सिंककडून संप्रभ फळदेसाईने ११ धावांत २, साईराज धोंडने १३ धावांत १, सनत म्हापणे याने २५ धावांत १ व गौरव गायतोंडे याने २५ धावांत १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यातील वैयक्तिक बक्षिसे
संकल्प भट : ड्रोगारिया कोलवाळकर पुरस्कृत सामनावीर पुरस्कार, प्रायॉरिटी कन्स्ट्रक्शन्स सर्वोत्तम फलंदाज : सरिन काणे, सर्वोत्तम गोलंदाज : संप्रभ फळदेसाई.