इशान किशन-पंच भिडले : भारताचा ७ विकेटने पराभव
क्वीन्सलँड : भारताचा अ संघ दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. मॅके, क्वीन्सलँड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत अ संघावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप करण्यात आला. मैदानावर उपस्थित अंपायर शॉन क्रेग यांनी हा आरोप केला. त्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ उशिराने सुरू झाला. यादरम्यान इशान किशन आणि पंच यांच्यात वादही झाला. शेवटी टीम इंडियाने हा सामना ७ विकेटने गमावला.
वास्तविक, चेंडूवरील ओरखडल्याचे निशाण पाहून अंपायरने चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. चेंडू बदलण्यावरून इशान किशन आणि पंच यांच्यात वादही पाहायला मिळाला. वादविवादादरम्यान, अंपायर शॉन क्रेग स्टंप माईकद्वारे असे म्हणताना ऐकू आले की, जेव्हा तुम्ही स्क्रॅच केले तेव्हा आम्ही चेंडू बदलला. आता यावर आणखी चर्चा नाही, चला खेळ सुरू करा.
याला उत्तर देताना इशान किशन म्हणाला की आम्ही बदललेल्या चेंडूने खेळावे का? हा मूर्खपणाचा निर्णय आहे. इशान किशनचे हे विधान पंचांना आवडले नाही आणि त्यांनी भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला हे अयोग्य वर्तन असल्याचे सांगत याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्पष्ट करण्यात आले की, बॉलवर झालेल्या स्क्रॅचबाबत कोणीही एक व्यक्ती जबाबदार आहे, यावर अंपायरचा विश्वास नाही.
भारत अ संघाने गमावला सामना
ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारत-अ संघाला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला टीम इंडियाची अवस्था खूपच वाईट झाली होती. भारत अ संघ पहिल्या डावात अवघ्या १०७ धावांत सर्वबाद झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९५ धावा केल्या. यानंतर भारताने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ३१२ धावा केल्या. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया-ए लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि ३ बाद ३१२ धावा करत विजय मिळवला.