घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईटवॉश

न्यूझीलंडच्या विजयाचे फटाके : भारताच्या पराभवाचा आपटीबार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th November 2024, 12:18 am
घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईटवॉश

मुंबई : येथील वानखेडे मैदानावर झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. या सामन्यात २५ धावाने न्यूझीलंडचा विजय झाला. ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेमध्ये न्यूझीलंडने भारताला आपल्याच देशात व्हाईट वॉश दिला. भारतात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये सर्व सामने गमावण्याची ही टीम इंडियाची पहिलीच वेळ आहे.
मागील २४ वर्षांपासून भारतीय संघाचा घरच्या मैदानात व्हाईट वॉश झाला नाही. आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला घरच्या मैदानावर एकदाच व्हाईट वॉशचा सामना करावा लागला होता. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन सामन्याची कसोटी मालिका गमावली होती. हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकाने २००० मध्ये टीम इंडियाला भारतामध्ये २-० ने पराभवाचा धक्का दिला होता. वानखेडे स्टेडियमवर आफ्रिकाने ४ विकेटने विजय मिळवला होता. तर बंगळुरुमध्ये डाव आणि ७१ धावांनी भारताला धूळ चारली होती.
दरम्यान, न्यूझीलंडने बंगळुरु आणि पुणे कसोटीत विजय मिळवत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरही वर्चस्व गाजवले. मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर आटोपला होता. भारताकडून डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतल्या. या सामन्यात किवी टीमने पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला २८ धावांची आघाडी मिळाली होती.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य होत‍े. छोट्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अनेकवेळा फसली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिली विकेट १३ धावांवर गमावली, त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली.
भारताने अवघ्या २९ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. भारतासाठी सर्वात मोठी खेळी ऋषभ पंतने खेळली. त्याने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६४ धावा केल्या. या काळात टीम इंडियाच्या एकूण आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अखेरीस हतबल झालेल्या टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.
कोहलीच्या ६ डावांत केवळ ९३ धावा
मुंबईत विराट कोहलीने पहिल्या डावात ४ धावा आणि दुसऱ्या डावात १ धाव केली. प्रथमच घरच्या मैदानावर खेळताना त्याला दोन्ही डावांत दुहेरी आकडा गाठता आला नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या या मालिकेत त्याने ६ डावांत केवळ ९३ धावा केल्या.
पंतने दोन्ही डावांत झळकावली अर्धशतके
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या डावात ५९ चेंडूत ६० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर त्याने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावणारा तो तिसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी (वेलिंग्टन, २००९) आणि वृद्धिमान साहा (कोलकाता, २०१६) यांनी ही कामगिरी केली आहे.
एजाज पटेलची विशेष कामगिरी
एजाज पटेलने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. तो आता भारतातील कोणत्याही मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारा विदेशी गोलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडच्या इयान बॉथम यांला मागे टाकले आहे. बोथम यांनी वानखेडेमध्येच २२ विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे एजाजने वानखेडे स्टेडियमवर एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.
जडेजाचे कसोटीत तिसऱ्यांदा १० बळी
जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा १० विकेट्स घेतल्या आहेत. तो आता भारताकडून सर्वाधिक १० बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याच्या पुढे अनिल कुंबळे (८), अश्विन (८) आणि हरभजन सिंग (५) आहेत. जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्यांदाच १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या संघाविरुद्ध ११ कसोटी सामन्यांच्या २२ डावांत २७.४८च्या सरासरीने एकूण ४१ बळी घेतले आहेत.
असा झाला सामना
डॅरिल मिशेलच्या (८२) खेळीमुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने शुभमन गिलच्या (९०) खेळीच्या जोरावर २६३ धावा करत आघाडी घेतली. पहिल्या डावाच्या जोरावर पिछाडीवर पडलेला किवी संघ दुसऱ्या डावात १७४ धावांत गडगडला. प्रत्युत्तरात लहान लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २९ धावा होईपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर ऋषभ पंतने वॉशिंग्टन सुंदरच्या जोडीने ४२ धावांची भागिदारी केली. पंतचे अर्धशतक झाले. पण, तो बाद झाल्यानंतर संघाचा पराभव झाला.
किवीजने भारतात प्रथमच जिंकली कसोटी मालिका
न्यूझीलंड संघाने इतिहास रचला. त्यांनी भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली इतकेच नाही तर टीम इंडियाला क्लीन स्वीपही दिला. न्यूझीलंडने १२ वर्षांनंतर भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्यास भाग पाडले. यास टीम इंडियाची घरच्या मैदानावर सलग १८ मालिका विजयांची मालिकाही खंडित केली. विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडने ही कसोटी मालिका केन विल्यमसनशिवाय खेळली आहे. तसेच, टॉम लॅथम प्रथमच संघाचे नेतृत्व करत होता.
डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताने डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलमधील अव्वल स्थान गमावले आहे. आता भारताला मागे टाकत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडला बंपर फायदा झाला आहे. न्यूझीलंड भारताविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधून डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांची विजयाची टक्केवारी ५४.५४ झाली आहे. तर पराभवानंतर भारताच्या विजयाची टक्केवारी ५८.३३ झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सध्याच्या डब्ल्यूटीसी हंगामात ८ कसोटी जिंकल्या आहेत आणि ५ गमावल्या आहेत. याशिवाय १ सामना अनिर्णित राहिला आहे.