गोवा : सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळा;आतापर्यंत ९० टक्के कामे पूर्ण: मुख्यमंत्री

सर्व कामे येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd November 2024, 04:07 pm
गोवा : सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळा;आतापर्यंत ९० टक्के कामे पूर्ण:  मुख्यमंत्री

पणजी : जूने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याच तयारीच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हजर होते. दरम्यान सोहळ्याची सर्व कामे येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होतील असे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. 

तसेच आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यंदाचा सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला जाईल. भविकांसाठी कदंबच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात येईल तसेच रस्त्याची कामे देखील येत्या ८ दिवसांत पूर्ण होतील असे ते म्हणाले. एकंदरीत सुरू असलेल्या कामाची गती समाधानकारक अशीच आहे असेही ते म्हणाले. यावेळी २०० जणांना व्हीआयपी पास दिले जातील. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा १७ वा शव प्रदर्शन सोहळा २१ नोव्हेंबर ते ५ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. 

दरम्यान उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि वाहतूक खात्याचे पोलीस अधीक्षक वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. चर्चच्या परिसरात २ हजार वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल. येथे फुटपाथ तसेच भूमिगत विज वाहिन्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सोहळ्यादरम्यान वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी  २०० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर देखील बसवण्यात आला आहे. याठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी होणाऱ्या सोहळ्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. ते कुठे व कसे बसवावेत यावर पोलिसांचा विचार सुरू असल्याचे आयोजन समितीच्या सदस्यांनी सांगितले.  


हेही वाचा