मुंबई कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड : दुसऱ्या डावात न्यूझीलंड ९ बाद १७१ धावा
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना वानखेडे, मुंबई येथे खेळवला जात आहे. मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात न्यूझीलंडची धावसंख्या ९ बाद १७१ धावा अशी झाली असून किवी संघाची आघाडी १४३ धावांपर्यंत वाढली आहे. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुक नाबाद माघारी परतले.
शनिवारी दुसऱ्या डावात किवीजकडून विल यंगने सर्वाधिक ५१ धावांची शानदार खेळी केली. त्याशिवाय कॉनवे २२, मिशेल २१ आणि फिलिप्सने २६ धावा केल्या. भारताकडून जडेजाने ४ आणि अश्विनने ३ विकेट घेतल्या. तर आकाश दीप आणि सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. त्यानंतर शनिवारी भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपला. यावेळी टीम इंडियाला २८ धावांची आघाडी मिळाली होती.
दरम्यान, शनिवारी भारताने ४ बाद ८६ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि उर्वरित सहा विकेट्स गमावताना आणखी १७७ धावा जोडल्या. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शनिवारी भारतीय डाव पुढे नेला आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. या काळात पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३वे अर्धशतक तर गिलने सातवे अर्धशतक झळकावले.
मोठा फटका मारण्याच्या नादात पंत पायचित झाला. ईश सोधीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंत ५९ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाला. यानंतर भारताचा डाव गडगडला. एकवेळ भारताची धावसंख्या ४ बाद १८० धावा होती मात्र त्यानंतर ८३ धावा करताना टीम इंडियाने शेवटच्या ६ विकेट गमावल्या.
पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा १४ धावा करून बाद झाला आणि रविचंद्रन अश्विन ६ धावा करून बाद झाला. शुभमन गिलने १४६ चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. सर्फराज खान आणि आकाश दीप यांना खातेही उघडता आले नाही.
वॉशिंग्टन सुंदरने शेवटी काही मोठे फटके मारले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. सुंदर ३६ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने पाच विकेट घेतल्या. तर मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
शुभमनची ९० धावांची झुंझार खेळी
भारतीय संघाच्या डावाची पडझड होत असताना, टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने एका बाजूने संघाची सूत्रे हातात घेतली. या सामन्यात त्याने १८४ चेंडूत ९० धावांची झुंझार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. एजाज पटेलच्या फिरकी चेंडूवर डिफेन्स करताना शुभमन बॅटचा स्पर्श होऊन स्लीपमध्ये असलेल्या मिचेलच्या हाती झेलबाद झाला. या सामन्यातील पटेलची ही चौथी विकेट ठरली. फलंदाज एकाबाजूने बाद होत असताना शुभमनने सुरुवातीपासूनच अँकरची भूमिका पार पाडली. त्याच्या ९० धावांच्या झुंझार खेळीने त्याने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली.
अश्विनने मोडला कुंबळेचा मोठा विक्रम
भारत न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटू आर अश्विनने मोठा कारनामा केला. त्याने फिरकीपटू अनिल कुंबळेचा एक विक्रम मोडीत काढला. अश्विनने दुसऱ्या डावात रचिन रवींद्रची विकेट घेतली. या विकेटनंतर भारताकडून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. त्याने वानखेडेवर ४२ विकेट घेतल्या. तर अनिल कुंबळेने ३८, कपिल देवने २८, हरभजन सिंगने २४ आणि कर्सन घावरीने २३ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने वानखेडे स्टेडियमनंतर चेन्नईच्या एमए चिदंबरमवरही सर्वाधिक ४२ विकेट घेतल्या आहेत.
............
५५ वर्षे जुना विक्रम मोडीत
- भारत-न्यूझीलंड मालिकेत फिरकीपटूंची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मुंबई कसोटी सामन्यातही असे चित्र पाहायला मिळाले. मुंबईत दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मिळून मोठा रेकॉर्ड केला आहे.
- मुंबई कसोटीत तिसरा डाव सुरू असून आतापर्यंत फिरकीपटूंनी २४ विकेट घेतल्या आहेत. तर बंगळुरु आणि पुण्यात फिरकीपटूंनी घेतलेल्या विकेट्सची बेरीज केली तर एकूण ७१ विकेट घेतल्या आहेत.
- भारतात पहिल्यांदाच ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इतक्या विकेट घेतल्या गेल्यात. १९५६ साली भारत ऑस्ट्रेलिया ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी ६६ विकेट घेतल्या होत्या.
- १९७६ साली भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी ६५ विकेट घेतल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला असून फिरकीपटूंनी या मालिकेत ७०चा आकडा गाठला आहे.