एफसी गोवाची ‘हॅप्पी दिवाळी’

इंडियन सुपर लीग : बंगळुरूवर ३-० ने विजय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd November 2024, 11:27 pm
एफसी गोवाची ‘हॅप्पी दिवाळी’

मुंबई : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२४-२५ हंगामातील साखळी सामन्यात शनिवारी एफसी गोवाने बंगळूरू एफसीवर ३-० असा विजय मिळवत घरच्या मैदानावर दिवाळी साजरी केली. एफसी गोवाचे तिन्ही गोल उत्तरार्धात झाले. शेवटच्या ९ मिनिटांतील २ गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या पराभवाने पाहुण्या बंगळूरू एफसीची यंदाच्या हंगामातील सलग सहा अपराजित सामन्यांची मालिका खंडित झाली.
गोलशून्य बरोबरीमुळे दुसऱ्या सत्राची उत्सुकता वाढली. त्यात सर्वोत्तम खेळ करत यजमान एफसी गोवाने वर्चस्व राखले आणि विजयासह तीन गुणांची कमाई केली. अर्मांडो सडिकूने एम. यासिरच्या पासवर ६३व्या मिनिटाला पाहुण्यांची बचावफळी भेदताना एफसी गोवाला १-० असे आघाडीवर नेले. या आघाडीमुळे यजमानांचा आत्मविश्वास उंचावला तर बंगळूरू एफसी संघ दडपणाखाली आला. त्याचा फायदा उठवत ब्रिसन फर्नांडिसने ७२व्या मिनिटाला एफसी गोवाची आघाडी २-० अशी वाढवली. यावेळी त्याला अर्मांडो सडिकूची साथ मिळाली. निर्धारित वेळेपूर्वी देजान ड्रॅझिकने इकेर ग्वारोटझेनाच्या पासवर चेंडूला अचूक गोलपोस्टमध्ये टाकला. यजमानांचा हा तिसरा गोल होता.
सडिकू आणि आकाश संगवानने ऑन टार्गेट चेंडू मारताना बंगळूरू एफसीच्या आघाडी फळीची चाचपणी केली. त्यानंतर पाहुण्या संघाच्या फॉरवर्डनी काही आक्रमक चाली रचताना गोल करण्याचे प्रयत्न केले. यजमान एफसी गोवाला प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक पेनल्टी कॉर्नर मिळाले तरी बंगळूरू एफसीच्या बचावफळीने कुठलीही चूक न करता चेंडू व्यवस्थित क्लिअर केला. दोन्ही टीमना डाव आणि प्रतिडाव टाकण्याच्या प्रयत्नात अपयश आल्याने मध्यंतराला गोलशून्य बरोबरी राहिली होती.
उत्तरार्धातील उंचावलेल्या खेळाच्या जोरावर एफसी गोवाने ७ सामन्यातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. एकूण गुणसंख्या ९ वर नेत पॉइंट्स टेबलमध्ये टॉप फाईव्ह संघांत स्थान मिळवले. शनिवारच्या पराभवाने बंगळूरूची यंदाच्या हंगामातील सलग सहा अपराजित सामन्यांची मालिका खंडित झाली. मात्र, त्यांचे अव्वल स्थान कायम आहे. पाहुण्या संघाच्या खात्यात ७ सामन्यांतून सर्वाधिक १६ गुण आहेत.
सामन्याचा निकाल 
एफसी गोवा ३ (अर्मांडो सडिकू ६३व्या मिनिटाला, ब्रिसन फर्नांडिस ७२व्या मिनिटाला, देजान ड्रॅझिक ९०व्या मिनिटाला) विजयी वि. बंगळूरू एफसी ०.