मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे

टीम इंडियाची घसरगुंडी : डॅरिल मिशेल, विल यंगची अर्धशतके, जडेजाचे पाच बळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st November 2024, 11:47 pm
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण १४ विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ २३५ धावांवर गडगडला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने ८२ आणि विल यंगने ७१ धावा केल्या.
भारताकडून रवींद्र जडेजाने ५ आणि वॉशिंग्टन सुंदरने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ विकेट गमावून ८६ धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्मा १८ धावा करून बाद झाला, तर विराट कोहली ४ धावा करून रनआऊट झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने दोन बळी घेतले.
सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाशदीपने किवी संघाला पहिला धक्का दिला. त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. कॉनवेला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर टॉम लॅथम आणि विल यंग यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी झाली. वॉशिंग्टन सुंदरने ५९ धावांवर न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. सुंदरने लॅथमला बोल्ड केले. तो २८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर राचिन रवींद्रही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. राचिन पाच धावा करून बाद झाला. राचिनला सुंदरनेच बोल्ड केले. ७२ धावांवर तीन विकेट पडल्यानंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांच्यात ८७ धावांची भागीदारी झाली. विल यंग ७१ धावा करून बाद झाला. त्यानंतर किवी संघाने सातत्याने विकेट गमावल्या. ग्लेन फिलिप्स १७, डॅरिल मिशेल ८२, ईश सोधी ७, मॅट हेन्री ० आणि एजाज पटेल ७ धावा करून बाद झाले. अशाप्रकारे न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २३५ धावांत बाद झाला. रवींद्र जडेजाने भारतासाठी ५ बळी घेतले. तर वॉशिंग्टन सुंदरने ४ जणांना माघारी पाठवले.
यानंतर भारताचा डाव सुरू झाला. सलामीला आलेल्या रोहित शर्माने तीन चौकार मारले, पण तो जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. रोहित १८ चेंडूत १८ धावा करून बाद झाला. एकेकाळी भारताची धावसंख्या एक बाद ७८ होती, पण त्यानंतर लागोपाठ तीन विकेट पडल्या. यशस्वी जैस्वाल ३०, मोहम्मद सिराज ० आणि विराट कोहली चार धावा करून बाद झाले. कोहली धावबाद झाला. दिवसअखेर शुबमन गिल ३१ आणि रिषभ पंत १ धावा करून नाबाद राहिले. न्यूझीलंडकडून आतापर्यंत एजाज पटेलने दोन आणि विल्यम ओरूकने एक बळी घेतला.
रवींद्र जडेजाने केला मोठा पराक्रम
रवींद्र जडेजाने वानखेडेवर ग्लेन फिलिप्सची विकेट घेत महान खेळाडूंच्या यादीत आपले नाव सामील केले आहे. जड्डू आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. जडेजाने या प्रकरणात झहीर खान आणि इशांत शर्माला मागे टाकले आहे. जड्डूच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये ३१२ विकेट्स आहेत. त्याचबरोबर झहीर आणि इशांतने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये ३११ विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे (६१९) आहे.
भारत-न्यूझीलंड मुंबई कसोटीत विराट कोहली धावबाद झाला आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरली. विराट कोहलीने चौकारासह खाते उघडले होते, त्यामुळे चाहते आनंद साजरा करत होते. पण पुढच्याच चेंडूवर तो धावबाद झाला आणि अवघ्या ४ धावा करत त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. विकेटच्यादरम्यान धावा काढण्यात विराट पटाईत आहे, पण यावेळी मात्र त्याच्या वेगावर मॅट हेन्रीच्या थ्रोने मात केली आणि भारताला मोठा धक्का बसला. पण ४ धावा करून बाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
विराटच्या नावे दोन विश्वविक्रम
विराट कोहली भलेही ४ धावा करून बाद झाला तरीही त्याने २ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. खरेतर कोहली मैदानावर येताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६०० डाव पूर्ण केले. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० डाव खेळणारा पहिला सक्रिय क्रिकेटपटू ठरला. ६०० आंतरराष्ट्रीय डाव खेळण्याचा विक्रम करणारा विराट कोहली हा केवळ तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी केवळ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने भारतासाठी ही मोठी कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर हा टप्पा गाठणारा तो जगातील आठवा क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडित काढला आहे. यापूर्वी ६०० डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर होता. विराट कोहली ६०० डावांनंतर सर्वाधिक २७ हजार अधिक धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव (इनिंग) 

खेळणारा सक्रिय क्रिकेटपटू

६०० – विराट कोहली
५१८ – मुशफिकर रहीम
५१८ – रोहित शर्मा
४९१ – शाकिब अल हसन
४७० – अँजेलो मॅथ्यूजबॉक्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव
खेळणारा भारतीय क्रिकेटपटू

सचिन तेंडुलकर- 7७८२
राहुल द्रविड- ६०५
विराट कोहली- ६००
एमएस धोनी- ५२६
रोहित शर्मा- ५१८

६०० डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

२७१३३ – विराट कोहली*
२६०२० – सचिन तेंडुलकर
२५३८६ – रिकी पाँटिंग
२५२१२ – जॅक कॅलिस
२४८८४ – कुमार संगकारा
२४०९७ – राहुल द्रविड
२१८१५ – महेला जयवर्धने